जळगावचे केळी एक्सलन्स सेंटर रद्द
By Admin | Updated: May 17, 2016 02:54 IST2016-05-17T02:54:38+5:302016-05-17T02:54:38+5:30
केळी एक्सलन्स सेंटर कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना अंधारात ठेवून राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने परस्पर रद्द केले

जळगावचे केळी एक्सलन्स सेंटर रद्द
राहुल कलाल,
पुणे-इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरून केळी पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी जळगावमध्ये प्रस्तावित करण्यात आलेले केळी एक्सलन्स सेंटर कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना अंधारात ठेवून राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने परस्पर रद्द केले आहे. विशेष म्हणजे, या केंद्राची घोषणा खडसे यांनी केली होती. त्यामुळे जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी सुमारे ५२ एकर जमीनही दिली होती. आता या केळी एक्सलन्स केंद्राच्या जागी भाजीपाला एक्सलन्स केंद्र उभारण्याचा नवा प्रस्ताव मंडळाने तयार केला आहे.
कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर करून उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या इस्त्राईल सरकारला बरोबर घेऊन महाराष्ट्रातील कृषीचे उत्पादन वाढविण्यासाठी इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने हाती घेतली आहे. यासाठी इस्त्राईल आणि भारत यांच्यात करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत रत्नागिरीमध्ये आंबा एक्सलन्स सेंटर आणि नागपूरमध्ये संत्रा एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे या योजनेअंतर्गत केळीसाठी एक्सलन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने तयार केला होता.
जळगाव जिल्हा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा असल्याने त्यांना या सेंटरची माहिती देण्यात आली होती. केळीत संशोधनासाठी जळगावमध्ये एक्सलन्स सेंटर उभारण्याची घोषणाही खडसे यांनी केली होती. या सेंटरचे काम त्वरित सुरू व्हावे, यासाठी खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या सेंटरसाठी सुमारे ५२ एकर जागा देण्यासही सांगितले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने
ही जागा राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला केळी एक्सलन्स सेंटर उभारणीसाठी दिली होती. एवढे सोपस्कार पार पाडल्यानंतर राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने अचानक केळीसाठीचे हे एक्सलन्स सेंटर न उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात केळी उत्पादनासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते ते जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानापैकी एक असल्यामुळे यात नवे तंत्रज्ञान नाही, असे इस्त्राईलने राज्य
फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला सांगितले आहे. त्यामुळे मंडळाने केळी एक्सलन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव रद्द करून तेथे भाजीपाला एक्सलन्स सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्तावही तयार
करण्यात आला आहे. राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने केलेला हा खटाटोप खडसे यांना माहितीच नसल्याचे उघड
झाले आहे.