सनातनवर बंदी घाला- संभाजी ब्रिगेड
By Admin | Updated: June 30, 2016 00:42 IST2016-06-30T00:42:03+5:302016-06-30T00:42:03+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये सातत्याने सनातन संस्थेचे नाव पुढे येत आहे

सनातनवर बंदी घाला- संभाजी ब्रिगेड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये सातत्याने सनातन संस्थेचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नार्को चाचणी करून संस्थेवर बंदी घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
सनातनवर बंदी घातली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला. ते म्हणाले की, राज्य सरकारकडे सनातनच्या साधकांविरोधात सबळ पुरावे आहेत. मात्र ते मुद्दाम न्यायालयासमोर आणले जात नाही. सातवा वेतन आयोग लागू करण्यावरूनही संभाजी ब्रिगेडने सरकारवर टीका केली. वेतनवाढअभावी सरकारी कर्मचारी आत्महत्या करणार नाहीत. मात्र शेतमालाला हमीभाव मिळाल्यास शेतकरी नक्कीच आत्महत्या करायचा थांबेल. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संबंधित मागण्यांचे निवेदन देणार आहे. मात्र त्या पूर्ण झाल्या नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.