शिवसेनेबाबत जाहीर मतप्रदर्शनास बंदी
By Admin | Updated: November 10, 2014 04:31 IST2014-11-10T04:31:18+5:302014-11-10T04:31:18+5:30
मंत्रीपदाबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली असल्याने भाजपाच्या आमदारांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवन सोडून जाऊ नये
शिवसेनेबाबत जाहीर मतप्रदर्शनास बंदी
मुंबई : मंत्रीपदाबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली असल्याने भाजपाच्या आमदारांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवन सोडून जाऊ नये तसेच शिवसेनेबाबत प्रसिद्धी माध्यमांकडे कुठलेही जाहीर मतप्रदर्शन करू नये, असे सक्त आदेश भाजपा विधिमंडळ पक्षाने जारी केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपा आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये सरकार अल्पमतात असून विधानसभा अध्यक्षांची निवड करताना आणि विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेताना मतदान होणार असल्याने भाजपाच्या आमदारांनी पुढील तीन दिवस कुठल्याही परिस्थितीत विधान भवन सोडून जाऊ नये, असे सक्त आदेश देण्यात आले.
मंत्रीपदांच्या मागणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम असून त्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र सध्याचा शिवसेनेचा पवित्रा आक्रमक असल्याने यदाकदाचित त्यांची भूमिका विरोधी असू शकते. मात्र जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव संमत होत नाही; तोपर्यंत भाजपाच्या आमदारांनी दूरचित्रवाहिन्या तसेच वृत्तपत्रांकडे जाहीर मतप्रदर्शन करू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.
उद्धव यांचा शिवसेनेवरील ताबा सुटला - भाजपाचा निष्कर्ष
शिवसेनेने मंत्रीपदाकरिता राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांचे नाव निश्चित केल्याने पक्षातील चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ हे ज्येष्ठ लोकसभा सदस्य नाराज झाले होते. देसाई मंत्रीपदाची शपथ घेण्याकरिता दिल्लीत दाखल झाले, तेव्हाच महाराष्ट्राबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत केंद्रात मंत्रीपदाची शपथ शिवसेना घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अडसूळ यांनी देऊन उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे खासदारांच्या नाराजीचा स्फोट होईल, या भीतीने शपथविधीपूर्वीच ठाकरे यांनी देसाई यांना परत येण्याचा आदेश दिला, असे मत भाजपा नेत्यांच्या बैठकीत व्यक्त झाले. ठाकरे यांचा शिवसेनेवरील ताबा सुटत असून लवकरच शिवसेनेत नाराजीचा
स्फोट होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे. (विशेष प्रतिनिधी)