बंदी झुगारून एकबोटे गडावर !
By Admin | Updated: November 28, 2014 23:54 IST2014-11-28T22:59:45+5:302014-11-28T23:54:45+5:30
गनिमी कावा : पोलिसांनी दोन सहकाऱ्यांसह घेतले ताब्यात

बंदी झुगारून एकबोटे गडावर !
महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश असतानाही प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे शुक्रवारी वेशांतर करून नाट्यपूर्णरीत्या पोलिसांचा प्रचंड पहारा असताना प्रतापगडावर पोहोचले. मात्र, भवानीमातेचे दर्शन घेऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे जात असताना हवालदाराची नजर त्यांच्यावर पडल्याने हा प्रयत्न फसला आणि दोन सहकाऱ्यांसह त्यांना ताब्यात घेण्यात आले.
प्रतापगडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाच्यावतीने शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात स्थानिक आणि शिवप्रेमी या सोहळ्याला हजर राहिले. उत्सवाचा समारोप करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गड सोडला तर इतर अधिकारी जवळपासच्या ढाब्यांवर जेवण्यासाठी गेले. गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांना जिल्हाबंदी करण्यात आली होती. पूर्वीही त्यांनी असे /आदेश मोडल्यामुळे यंदा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गडावर जाणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी केली होती. गडाभोवतीच्या जंगलातही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असे असताना एकबोटे तेथे येण्याचे धाडस करणार नाहीत, असे प्रशासनाला वाटल्याने वरिष्ठ अधिकारी गेल्यावर गडाचा वेढा ढिला पडला.
दुपारी बाराच्या दरम्यान प्रतापगड उत्सव समितीचे अनेक कार्यकर्ते गडावर पोहोचले होते. यात मिलिंद एकबोटे यांचे बंधू नंदकुमार यांचाही समावेश होता. तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भोसले हेही वाईहूनआले होते. मिलिंद एकबोटे यांनी वेशांतर केले होते. रंगीत टी-शर्ट, जीन्स, टोपी, गॉगल, स्पोर्ट्स शूज अशा पोशाखात ते एका मोटारसायकलवरून एकेक नाकाबंदी पार करीत गडावर पोहोचले. त्यांनी भवानीमातेचे दर्शन घेतले आणि शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना एका हवालदाराला संशय आला.
ओळख पटताच हवालदाराने एकबोटे यांना थांबविले आणि खात्री पटताच पोलिसांनी त्यांना गराडा घातला. त्याच वेळी शिवभक्तांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. एकबोटे यांनी सहकार्याचे आवाहन करताच कार्यकर्ते शांत झाले. पोलिसांच्या वेढ्यातच एकबोटे यांना गडावरून खाली आणण्यात आले आणि पोलीस वाहनातून महाबळेश्वर येथे आणण्यात आले. तेथे गाडी बदलण्यात आली. पोलीस त्यांना कोठे नेत आहेत, हे कोणाला कळू नये म्हणून नाकाबंदी करण्यात आली.
(प्रतिनिधी)
पत्रकारांना रोखले
पोलीस उपअधीक्षक संजय पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली जीपमधून एकबोटे यांना साताऱ्याकडे नेले जात असताना पत्रकार मोटारसायकलवरून जीपच्या मागे गेले. पत्रकार जवळ पोहोचल्याचे समजताच पखाले खाली उतरले आणि गाडी पुढे गेली. पखाले यांनी पत्रकारांच्या दुचाकीच्या चाव्या ताब्यात घेतल्या. पंधरा मिनिटांनी पत्रकारांना गाड्या परत करून ते महाबळेश्वरला परतले. एकबोटे यांना सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत सोडले.