बम्बार्डियरच्या सर्र्वेक्षणाचा घोळात घोळ
By Admin | Updated: April 13, 2015 11:35 IST2015-04-13T05:40:00+5:302015-04-13T11:35:55+5:30
नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलच्या सर्वेक्षणाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. एम-इंडिकेटरमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने

बम्बार्डियरच्या सर्र्वेक्षणाचा घोळात घोळ
मुंबई : नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलच्या सर्वेक्षणाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. एम-इंडिकेटरमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आयत्यावेळी मागे घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात एम-इंडिकेटरनेच पुढाकार घेऊन या लोकलबाबत जनमताचा कौल घेण्याचा निर्णय घेतला आणि रविवारपासून सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. या लोकलचे सर्वेक्षण दोन आठवडे सुरू राहणार आहे.
दोन बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ मार्च रोजी दाखल झाल्यानंतर या लोकल प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या की नाही याची माहिती घेण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला.
त्यानुसार १८ मार्चपासून प्रथम आपल्या वेबसाईटवर फॉर्म टाकून प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जास्तीतजास्त प्रवाशांपर्यंत पोहोचता येत नसल्याने या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या थेट प्रतिक्रियाच घेण्याचा निर्णय घेत त्यासाठी आपल्याच कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. यासाठी एका आठवड्यात ३ हजार प्रवाशांच्या प्रतिक्रियांचे टार्गेट त्यांना देण्यात आले. यावरच न थांबता एमआरव्हीसीकडून बम्बार्डियर लोकलबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी एम-इंडिकेटरचा पर्यायही निवडला. यासाठी सर्व सोपस्कारही पूर्ण करण्यात आले.
मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनाच एम-इंडिकेटरमार्फत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती न देण्यात आल्याने रागावलेल्या सहाय
यांनी तत्काळ हे सर्वेक्षण मागे घेण्याच्या सूचना केल्या आणि सर्वेक्षण मागेही घेण्यात आले. (प्रतिनिधी)