बालगंधर्व नाटयगृहाबाहेर भाजप, आप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
By Admin | Updated: June 5, 2016 16:02 IST2016-06-05T11:28:40+5:302016-06-05T16:02:05+5:30
पुण्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी रविवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने केली.

बालगंधर्व नाटयगृहाबाहेर भाजप, आप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ - पुण्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी रविवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. पुण्यात बालगंधर्व नाटयगृहात भाजपने कौशल्य विकास मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अमित शहा आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यक्रम संपल्यानंतर आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणा युद्ध रंगले होते. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आपचे फलक फाडले़, तर काहींना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरुन हलवले. परवानगी दिली नसतानाही निदर्शनं करणा-या आप कार्यकर्त्यांना डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अमित शहा 'हाय हाय' अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळीच रोखल्याने काँग्रेस नेते आणि पोलिसांमध्ये काही वेळ वादावादी झाली. पुणे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे आंदोलनकर्त्यांसोबत होते.