बालगंधर्वांचे सहकारी पुंडलिक वेर्णेकर यांचे निधन
By Admin | Updated: January 18, 2015 00:56 IST2015-01-18T00:56:31+5:302015-01-18T00:56:31+5:30
महाडमधील ज्येष्ठ रंगकर्मी पुंडलिक नारायण वेर्णेकर यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

बालगंधर्वांचे सहकारी पुंडलिक वेर्णेकर यांचे निधन
महाड : बालगंधर्व, सोहराब मोदी, दामुअण्णा मालवणकर, नानासाहेब फाटक आदी ज्येष्ठ कलाकारांसमवेत अभिनयाचा ठसा उमटवणारे महाडमधील ज्येष्ठ रंगकर्मी पुंडलिक नारायण वेर्णेकर यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वेर्णेकर यांनी गाजलेल्या नाटकांमध्ये स्त्री पात्र वठवले. ‘एकच प्याला’ नाटकात गीता, ‘प्रेमसंन्यास’ यातील कृतिका या वेर्णेकरांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. दामुअण्णा मालवणकरांच्या ‘उधार उसनवार’ या नाटकात त्यांनी महाविद्यालयीन तरुणीची भूमिका वठवली. या भूमिकेसाठी स्वातंत्र्यवीर सावकरांनीही त्यांची प्रशंसा केली होती. (वार्ताहर)
बालगंधर्वांना अग्नी दिला
बालगंधर्वांचे पुण्यात निधन झाले, त्या वेळी शहरावर शोककळा पसरली होती. त्यांना अग्नी कोण देणार, असा प्रश्न उपस्थितांना पडला. तेव्हा पुंडलिक वेर्णेकर पुढे आले आणि त्यांनीच बालगंधर्वांना अग्नी दिला. गेल्या वर्षी वेर्णेकर यांचा १००वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वेर्णेकर यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.