- गणेश वासनिक
अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. परिणामी बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके गोदामात पडून आहेत. राज्यभरातील अशी ४२५ मेट्रिक टन पुस्तके मंडळाने रद्दीत विक्रीला काढली असून पेपर मिल्सकडून ई-निविदा मागविल्या आहेत.पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल येथील बालभारतीच्या विभागीय गोदामांत ही पुस्तके पडून आहेत. अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षे झालीत आणि आता वापरायोग्य नाहीत, अशा पुस्तकांची रद्दीत विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील बालभारती संचालक कार्यालयाने ई-निविदा काढली आहे. गतवर्षीच्या मार्चपासून शाळा बंद असताना पुस्तके का छापली, हासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित केली जातात. शाळा बंद असताना विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे पुस्तके छापूनही ती तशीच पडून असल्याने रद्दीत विकण्याची वेळी आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तूर्त रद्दीबाबत गाईडलाईन आलेल्या नाहीत, असे अमरावतीचे भांडार अधीक्षक रमेश गुंडरे म्हणाले.