असे वक्तव्य करणा-याला बाळासाहेबांनी फासावर लटकवले असते
By Admin | Updated: March 6, 2017 16:55 IST2017-03-06T16:55:51+5:302017-03-06T16:55:51+5:30
विधान परिषदेचा एखादा सदस्य इतक्या खालच्या स्तरावरचा विनोद करुच कसा शकतो. त्यांच्या या विधानामुळे आमदार म्हणून आमचीमान शरमेने खाली गेली आहे.

असे वक्तव्य करणा-याला बाळासाहेबांनी फासावर लटकवले असते
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 : विधान परिषदेचा एखादा सदस्य इतक्या खालच्या स्तरावरचा विनोद करुच कसा शकतो. त्यांच्या या विधानामुळे आमदार म्हणून आमचीमान शरमेने खाली गेली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असे वक्तव्य करणा-याला फासावर लटकवले असते, असे शिवसेना नेत्या निलम गो-हे म्हणाल्या. जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. परिचारक यांचे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आणि सभागृहाच्या परंपरेला काळीमा फासणारे असून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी भाजपा वगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली.
यावेळी भाजपाच्या एकाही सदस्याने भाष्य केले नाही. मात्र, सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षिय गटनेत्यांच्या बैठक बोलावण्यात यावी. या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, तो सरकारला मान्य असेल असे सांगितले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रशांत परिचारकांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. विधान परिषदेचे सदस्य असणा-या एखाद्याने अशी वक्तव्य करणे सर्वच सदस्यांनी लाजिरवाणी बाब आहे. प्रत्येक सदस्याने सभागृहाबाहेर देखिल शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे. त्यांनी हे वक्तव्य सभागृहाबाहेर केले असले तरी त्यांच्या त्या वक्तव्यामुळे सभागृहाला कमीपणा आला आहे. त्यामुळे परिचारकांचे सदस्यत्वच रद्द करण्यात यावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशांत परिचारक हे भाजपा पुरस्कृत आमदार आहेत. प्रचारादरम्यान परिचारक यांनी सैनिक पत्नींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी सर्व स्तरातून त्यांचा निषेध करण्यात आला होता.