बालाजीच्या भक्तांची हवाई सेवेला पसंती
By Admin | Updated: July 13, 2016 15:28 IST2016-07-13T15:09:39+5:302016-07-13T15:28:53+5:30
औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
_ns.jpg)
बालाजीच्या भक्तांची हवाई सेवेला पसंती
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13 - औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेली काही वर्षे तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे आणि खाजगी वाहनांचाच पर्याय भक्तांसमोर होता. मात्र,वर्षभरापूर्वी औरंगाबादेतून विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे आजघडीला बालाजी भक्तांकडून हवाई सेवेला चांगली पसंती मिळत आहे.
औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी तसेच ही दोन्ही धार्मिकस्थळे जोडण्याच्या उद्देशाने दक्षिणेतील ट्रु जेट कंपनीतर्फे २६ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. ७२ आसनी असलेल्या या कंपनीच्या विमानसेवेने तिरुपतीला जाण्यास बालाजी भक्तांचा ओढा अधिक आहे. हैदराबाद-तिरुपतीला जाण्यासाठी महिन्याला दीड हजारांवर प्रवासी या विमानसेवेला लाभ घेत आहे. यापूर्वी औरंगाबादेतून स्पाईस जेटने औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली होती. परंतु स्पाईस जेटने ही सेवा बंद केली आणि औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरु केली. त्यामुळे बालाजी भक्तांना रेल्वे आणि खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही.
स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाईस जेटचे विमान अखेरचे ठरले. ही विमानसेवा बंद झाल्याने शहराच्या असलेल्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट झाली. परंतु अवघ्या काही दिवसाच ट्रु जेट कंपनीने औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे औरंगाबादकर आणि विशेषत: बालाजी भक्तांना मोठा दिलासा मिळाला.
भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही विमानसेवा कायम राहिली पाहिजे, असे टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग म्हणाले. या विमान कंपनीची वर्षभराची सेवा म्हणजे यशाचे उदाहरण असल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे चालविण्यास प्राधान्य असल्याचे ट्रुजेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश म्हणाले.