बदलापूर सिनेमा पाहून लावला कारागृहाला सुरुंग!
By Admin | Updated: April 6, 2015 03:20 IST2015-04-06T03:20:51+5:302015-04-06T03:20:51+5:30
कारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा गौसच्या माध्यमातून बॅरॅक-६ मध्ये एलसीडी

बदलापूर सिनेमा पाहून लावला कारागृहाला सुरुंग!
जगदीश जोशी, नागपूर
कारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा गौसच्या माध्यमातून बॅरॅक-६ मध्ये एलसीडी पोहचविण्यात आली होती. १८ हजारांची एलसीडी बॅरॅकमध्ये आणण्यासाठी राजाने २५ हजार रुपयांची लाच दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यादिशेने सखोल चौकशी केल्यास कारागृहात तैनात आणखी काही अधिकाऱ्यांचे कारनामे समोर येऊ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
याप्रकरणाचा सूत्रधार राजा गौस कोट्याधीश आहे. त्याने साथीदाराच्या मदतीने मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, पंजाब व हरियाणा येथे दरोडे टाकले आहेत. यातून मिळविलेली संपत्ती खास माणसांकडे लपविली आहे. नागपूर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर राजाने कारागृहातून सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, दरोडा, लुटमारीचे १८ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे राजाची सहज सुटका होणे कठीण आहे. राजाने त्याचा खास सत्येंद्र गुप्ता याला बाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सत्येंद्र, शोएब ऊर्फ शिबू व बिसेन उईकेला जेलच्या बाहेर पाठविण्याची योजना आखली होती. हे तिघेही बॅरॅक नंबर -६ मध्ये होते. या बॅरॅकमध्ये बऱ्याच वर्षांपासून छोटा टीव्ही होता. राजा जेलच्या अधिकाऱ्यांशी बॅरॅकमध्ये एलसीडी लावण्यासाठी बोलला होता. अधिकाऱ्यांनी याबदल्यात २० ते २५ हजारांची लाच मागितली होती. राजा त्यासाठी तयार झाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून बॅरॅक मध्ये एलसीडी पोहचविण्यात आली.