बेशिस्त रिक्षांवर बडगा
By Admin | Updated: March 1, 2017 03:27 IST2017-03-01T03:27:12+5:302017-03-01T03:27:12+5:30
वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्तपणे कारवाईचा बडगा उचलत मंगळवारी ६० रिक्षा जप्त केल्या.

बेशिस्त रिक्षांवर बडगा
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील बस डेपोत प्रवेश करणाऱ्या बसचालकाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याच्या घटनेनंतर टीकेचे लक्ष्य ठरलेले वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्तपणे कारवाईचा बडगा उचलत मंगळवारी ६० रिक्षा जप्त केल्या. सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाल्याने रिक्षाचालकांची धावपळ सुरू होती. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
रिक्षाचालकाने एसटी चालकाला मारहाण करत त्याच्या बोटाचा तुकडा पडेपर्यंत चावा घेतला होता. त्यातून भिवंडी, ठाण्यापाठोपाठ कल्याणमधील रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात मंगळवारी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ६० रिक्षा जप्त केल्या.
रिक्षा चालक खाकी आणि पांढऱ्या रंगाचा गणवेश घालत नाहीत. त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे नसतात. बॅच नसतो. रिक्षाच्या अधिकृत रिक्षा स्टॅण्डवरुन भाडे न भरता बस डेपोच्या प्रवेश द्वारासमोर रिक्षा भाडे भरतात. प्रवेश बंदी असता त्याच मार्गातून मार्गक्रमण करतात.
कल्याण न्यायालय, दीपक हॉटेल, स्टेशन परिसर, बस डेपो, बैल बाजार ते गुरुदेव हॉटेल, शिवाजी चौक मार्गात आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी घिरट्या घालताना दिसत होती. रिक्षा संघटनांनी कारवाई करण्याची मागणी करुनही वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून कारवाई होत नसल्याचा आरोप केल्याने दखल घेत आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु केली. (प्रतिनिधी)
पाठ फिरताच रिक्षा परत
एरव्ही मनुष्यबळ कमी असल्याचे कारण वाहतूक पोलीस व आरटीओ देत असले तरी ही कारवाई झाली. त्यानंतरही पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा रिक्षा बस डेपोसमोरच्या रस्त्यावर उभ्या होत्या. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी कारवाई सातत्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले. मारहाणीच्या घटनेनंतर कारवाईचा फास आवळला, असे म्हणता येणार नाही. ही घटना गंभीर आहे. तिची दखल घेतल्याचे ते म्हणाले.