वैदू समाजाची जात पंचायतीला मूठमाती
By Admin | Updated: March 16, 2015 10:36 IST2015-03-16T02:46:36+5:302015-03-16T10:36:06+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात उभारलेल्या लढ्याला रविवारी मोठे यश मिळाले. आधुनिक युगात जात पंचायत ही संकल्पना कालबाह्य व

वैदू समाजाची जात पंचायतीला मूठमाती
अहमदनगर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात उभारलेल्या लढ्याला रविवारी मोठे यश मिळाले. आधुनिक युगात जात पंचायत ही संकल्पना कालबाह्य व कायद्याच्या विरुद्ध असल्याची स्पष्ट जाणीव झाल्याची कबुली देत वैदू समाजाने जात पंचायत बरखास्त करण्याची घोषणा श्रीरामपूर येथील बैठकीत केली.
अखिल भारतीय वैदू समाजाचे नेते चंदर बापू दासरजोगी, श्यामलिंग मारुती शिंदे, मल्लू मारुती शिंदे तसेच ‘अंनिस’च्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे, नगर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. रंजना गवांदे, आसिफ शेख यांच्या साक्षीने वैदू समाजाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. जात पंचायत कालबाह्य झाल्याचे पंचायतीनेच जाहीर केले. यापुढे समाजबांधवांनी प्रगती व विकास साधावा. शैक्षणिक व सामाजिक विकासाला प्राधान्य देत अनिष्ट रुढी परंपरांना फाटा द्यावा. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. राज्य घटनेच्या चौकटीत राहून आचरण व विचारात बदल करावा. सामाजिक परिवर्तनाचे कार्य जोपासावे, असे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधनामुळे जाणीव झाल्याचे बरखास्तीच्या घोषणापत्रात नमूद करून वैदू समाजाने परिवर्तनाच्या दिशेने नवे पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट केले आहे. या घोषणेसोबत वैदू जात पंचायतीने यापूर्वी घेतलेले निर्णय किंवा बहिष्कार रद्द झाले आहेत. (प्रतिनिधी)