लष्करामुळेच पुण्यात परतलो
By Admin | Updated: April 30, 2015 00:19 IST2015-04-30T00:19:45+5:302015-04-30T00:19:45+5:30
नेपाळच्या महाप्रलयकारी भूकंपाच्या ताडाख्यात सापडलेले पुण्यातील १६ पर्यटक बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सुखरुप परतले आहेत.

लष्करामुळेच पुण्यात परतलो
पुणे : नेपाळच्या महाप्रलयकारी भूकंपाच्या ताडाख्यात सापडलेले पुण्यातील १६ पर्यटक बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सुखरुप परतले आहेत. भारतीय लष्कर व नेपाळ पोलिसांच्या मदतीमुळे आमचा पुर्नजन्म झाला असून, त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही पुण्यात सुखरुप परतलो, असे प्रमोद झगडे यांनी सांगितले.
हडपसर येथील शुभांगी झगडे, प्रमोद झगडे, त्याचा मुलगा यांच्यासह सुमारे १६ लोक नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. याबाबत झगडे यांनी सांगितले, नेपाळ येथील नामजी बाझार येथे खरेदी करत असतानाचा अचानक जमीन हलत असल्याचे जाणवले. सुरुवातील आपल्यालाच चक्कर येते की काय असे वाटले. मात्र, त्याच वेळी सर्वत्र गोंधळ आणि आरडाओरड सुरूझाला. आमच्या समोरच काही इमारती कोसळत होत्या. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले येथे मोठा भूकंप झाला आहे. भूकंपाच्या जोरदार झटक्याने पायाखालची जमीन दुभंगते की काय, याची प्रचंड भीती वाटत होती.
जीव मुठीत घेऊन सर्वांनी सुरक्षित जागी असरा घेतला. येथील नेपाळ पोलिसांनी सर्वांनाच चांगला आधार दिला. त्यानंतर एक दिवसांनी भारतीय आर्मीच्या मदतीने आम्ही काठमांडूला पोहचलो. येथे विमानतळावर भारतात येणाऱ्या नागरिकांची प्रचंड संख्या होती. अखेर आमचा नंबर आला आणि बुधवारी सकाळी ११.३० वाजता आम्ही सुखरुप पुण्यात परतलो.
(प्रतिनिधी)