सिंधुदुर्गमधून बेबीकॉर्नची निर्यात सुरू
By Admin | Updated: February 19, 2015 23:57 IST2015-02-19T23:56:18+5:302015-02-19T23:57:08+5:30
पहिला कंटेनर जर्मनीला रवाना : देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचा उपक्रम

सिंधुदुर्गमधून बेबीकॉर्नची निर्यात सुरू
पुरळ : हापूस आंबा आणि मत्स्यउत्पादने निर्यातीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आता बेबीकॉर्नचीही निर्यात होऊ लागली आहे. त्याचा पहिला कंटेनर गुरुवारी जर्मनीला रवाना झाला.दाभोळे येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे यांच्या फळप्रक्रिया फॅक्टरीमध्ये प्रक्रिया केलेला हा ‘बेबीकॉर्न’ आहे. राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल याप्रसंगी उपस्थित होते. बेबीकॉर्न निर्यात प्रारंभाच्या निमित्ताने देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष रामभाऊ भोगले, पणनच्या अधिकारी बुरवंडे, गुहागरचे माजी आमदार विनय नातू, दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, बँक आॅफ महाराष्ट्रचे जामसंडे, शाखा व्यवस्थापक अभ्यंकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, पं. स. च्या सदस्या हर्षा ठाकूर, सुधीर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. सुधीरकुमार गोयल म्हणाले , आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न करा. केवळ आंबा उत्पादन प्रक्रिया करून प्रकल्प चालू ठेवता येणार नाही.
येथील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची हमी देऊन जर त्यांचा माल खरेदी केला तर लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल. शेतकरी व ग्राहकांना जोडणे ही एकप्रकारे तारेवरची
कसरत आहे. काजूसारख्या व्यवसायामध्ये खूप फायदा झाला नाही तरी तोटा मात्र नक्कीच होणार नाही. शासनाकडून व्यापाराची अपेक्षा न करता स्थानिक व्यापाऱ्यांनी या उद्योगात उतरणे गरजेचे आहे, असे गोयल यांनी सांगितले. महामँगोशी निगडित असलेल्या संस्थांना कर्जमाफी होणार आहे. या संस्थांना ऊर्जितावस्था मिळण्यासाठी त्यांनी आंबा उत्पादक संस्थेशी संलग्न राहून काम करावे. आपले प्रस्ताव येताच माझ्या अधिकारात अल्प कालावधीत त्यांना मंजुरी मिळेल, असे त्यांनी सूचित केले. या कार्यक्रमास माजी आमदार विनय नातू, भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी शेतकरी आणि छोट्या शेतीविषयक प्रकल्पांच्या व्यथा बोलून दाखवल्या. महाराष्ट्र चेंबर आॅफ कामर्सचे अध्यक्ष रामभाऊ भोगले यांनी पारंपरिक शेतीसोबत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिके घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अॅड अजित गोगटे यांनी केले. सूत्रसंचालन रेश्मा जोशी यांनी केले, तर सुधीर जोशी यांनी आभार मानले.
बेबीकॉर्न उत्पादनाचा पहिलाच प्रयोग
बेबीकॉर्नचे उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरु केले असून ते यशस्वी झाले आहे. देवगड तालुक्यातील इळये, पुरळ, नारिंग्रे, मालवण तालुक्यातील आचरा आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरात सध्या सुमारे १५ एकर शेतीक्षेत्रात त्याचे उत्पादन सुरू आहे. गुरुवारी जर्मनीला रवाना झालेल्या कंटेनरमध्ये ३ हजार बॉक्समध्ये ३६ हजार बाटल्या पॅक करण्यात आल्या आहेत. यातून सुमारे ११ ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. गुरुवारी रवाना झालेला कंटेनर मुंबई न्हावा शेवा येथील बंदरात दाखल होईल. त्यानंतर सोमवारी बोटीद्वारे ते जर्मनीला जाईल. हा सुमारे २१ दिवसांचा प्रवास आहे.