क्रीडापटूंच्या पायात बाबूगिरीची बेडी
By Admin | Updated: September 7, 2015 02:45 IST2015-09-07T02:11:11+5:302015-09-07T02:45:42+5:30
क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च गुणवत्ताधारक १२ क्रीडापटूंना राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय सेवेत दाखल करून घेतले. मात्र ‘बाबूगिरी’ची घट्ट बेडी या क्रीडापटूंच्या पायात अडकल्याने क्रीडा क्षेत्रातील स्थान टिकवण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सरावाकरिता त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही

क्रीडापटूंच्या पायात बाबूगिरीची बेडी
संदीप प्रधान, मुंबई
क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च गुणवत्ताधारक १२ क्रीडापटूंना राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय सेवेत दाखल करून घेतले. मात्र ‘बाबूगिरी’ची घट्ट बेडी या क्रीडापटूंच्या पायात अडकल्याने क्रीडा क्षेत्रातील स्थान टिकवण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सरावाकरिता त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. सरावाकरिता सवलत देण्याची रेल्वेत असलेली तरतूद राज्य सरकारी सेवेत नसल्याने क्रीडापटूंची घुसमट होत आहे.
राज्य सरकारच्या सेवेत श्रेणी-१च्या पदाकरिता पंकज शिरसाट (कबड्डी), धनंजय महाडिक (हॉकी), नवनाथ फडतरे (नेमबाजी), नरसिंह यादव (कुस्ती), नितीन घुले (कबड्डी), स्नेहल साळुंखे (कबड्डी), वीरधवल खाडे (जलतरणपटू), दीपिका जोसेफ (कबड्डी) या आठ जणांची तर श्रेणी-२च्या पदाकरिता दीपाली कुलकर्णी (पॉवरलिफ्टींग), सुहास खामकर (बॉडीबिल्डिंग), संदीप आवारी (पॉवरलिफ्टिंग), सतीश पाताडे (पॉवरलिफ्टिंग) या चार खेळाडूंची निवड करण्याचे आदेश ४ आॅक्टोबर २०११ रोजी देण्यात आले. अगोदर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने खेळाडूंच्या अर्जांची छाननी करून त्यांची निवड केली. आशियाई व जागतिक स्तरावर गौरवास्पद कामगिरी बजावलेल्या खेळाडूंची निवड केली गेली.
या क्रीडापटूंना सरकारने जबाबदारीची पदे दिल्याने बहुतांश क्रीडापटूंना आठ ते दहा तास सरकारी कामकाज करण्याकरिता द्यावे लागतात. स्नेहल साळुंखे या परळ येथील शिरोडकर शाळेतील क्लबतर्फे कबड्डी खेळतात. गेली तीन वर्षे त्यांची धारावी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती होती. दिवसभर कार्यालयात व्यस्त राहिल्यावर त्यांना सायंकाळी जेमतेम दोन तास सरावाकरिता वेळ मिळत होता. विवाह झाल्यावर कल्याणला राहायला गेलेल्या स्नेहल यांची महिनाभरापूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबागला बदली केली आहे. त्यामुळे सध्या सकाळी सात वाजता घर सोडणाऱ्या स्नेहल साडेदहा वाजता घरी पोहचतात. त्यांचे कब्बडी खेळणे बंदच झाले आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक करमणूक कर अधिकारी पदावर काम करीत असलेले संदीप आवारी हे सकाळी साडेनऊ वाजता घर सोडताना सोबत पॉवरलिफ्टींगची सर्व साधनसामुग्री घेऊन बाहेर पडतात. ठाणे जिल्ह्यातून करमणूक कर वसुलीचे ११५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. त्याच्या पूर्ततेकरिता त्यांना आठ तास द्यावे लागतात. त्यानंतर कार्यालयाजवळील जीममध्ये सराव करून रात्री अकरा वाजता ते घर गाठतात. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या संसदीय कार्य विभागात काम करणारे सतीश पाताडे हेही पावणेदहा ते साडेपाच सेवा बजावल्यावर सरावाकरिता मोकळे होतात. दुपारी सराव केला तर कार्यालयीन वेळेनंतर बसून त्यांना काम पूर्ण करावे लागते.