लंडनमध्ये बाबासाहेबांचे स्मारक
By Admin | Updated: February 4, 2015 02:14 IST2015-02-04T02:14:31+5:302015-02-04T02:14:31+5:30
आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या घराची किंमत ४१ कोटी रुपये आहे.

लंडनमध्ये बाबासाहेबांचे स्मारक
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन होणार
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडन येथील घर राज्य शासनातर्फे खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या घराची किंमत ४१ कोटी रुपये आहे.
घर खरेदीची प्रक्रि या पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. खरेदीची ही प्रक्रि या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
डॉ. आंबेडकर यांनी १९२१-२२ या कालावधीत लंडन येथील १० किंग्ज हेन्री रोड, एनडब्ल्यू ३ या घरात वास्तव्य केले होते. या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून डीएस्ससी इन इकॉनॉमिक्स आणि ग्रेझ इन या संस्थेतून बार अॅट लॉ या पदव्या संपादित केल्या. या वास्तव्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर संशोधनात्मक लिखाण केले होते. (विशेष प्रतिनिधी)
समितीत तावडे नाहीत
च्लंडनमधील घर खरेदी करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला होता. एका परिषदेसाठी ते लंडनला गेले असता त्यांनी या घराला भेट दिली आणि संबंधितांशी चर्चादेखील केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर, हे घर शासन खरेदी करणार असल्याचे तावडेंनी जाहीर केले होते. मात्र, घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीत तावडे यांचा समावेश नाही.