आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणा-या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 7, 2015 09:04 IST2015-10-07T08:58:09+5:302015-10-07T09:04:21+5:30
दादरी कांडानंतर भारतातील मुस्लिमांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने लक्ष घालण्याची मागणी करत घरातले भांडण चव्हाट्यावर नेत हिंदुस्थानचे वाभाडे काढणा-या आझम खानची हकालपट्टी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणा-या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - दादरी हत्याप्रकरणानंतर हिंदुस्थानातील मुसलमानांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने ( संयुक्त राष्ट्र संघ) लक्ष घालावे अशी मागणी करत देशाची इज्जत आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेणारे आझम खान हे एकप्रकारे देशद्रोही असून मुलायम सिंग यादव यांच्या धमन्यांत कणभर जरी राष्ट्रभक्ती असेल तर त्यांनी आझम खानची हकालपट्टी केली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आझम खानवर टीका केली आहे. 'सामना' या शिवेसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून त्यांनी आझम खान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आझम खानला देशातील कुठल्याही घटानात्मक पदावर राहण्याचा अधिकार नसून निवडणूक आयोगाने त्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे अशी मागणीही उद्धव यांनी केली आहे. दादरी येथे एका माणसाच्या मृत्यूनंतर सर्व बेगडी निधर्मी पक्ष व पुढारी नक्राश्रू ढाळत आहेत, मात्र मक्केतील चेंगराचेंगरीत हजारांवर मुस्लिम चिरडून मेले, त्यात शंभरेक भारतीयांचा समावेश आहे, पण त्या घटनेबाबत एकाही राजकीय पुढा-याने साधा उसासाही सोडला नाही. कारण त्यांच्या मरणाचा 'व्होट बँकेशी' संबंध नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
दादरी प्रकरणावरून भाजपावर होणा-या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ' या सर्व प्रकरणात भाजपाला हिंदुत्ववादी म्हणून झोडपणे सर्वार्थाने चूक आहे. सत्तेत असलेला भाजप शत-प्रतिशत निधर्मी म्हणूनच कारभार करीत आहे. मुसलमानांनी अर्ध्या रात्री दरवाजा ठोठवावा, आपण त्यांच्या मदतीस धावून जाऊ, असे वचन पंतप्रधान मोदी यांनीच दिले आहे. त्यामुळे अशा ‘निधर्मी’ राजवटीत मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून थेट ‘युनो’कडे धाव घेणे हा देशाचा व पंतप्रधान मोदींचा अपमान आहे' असे त्यांनी लेखात म्हटले आहे.
या लेखात उद्धव यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली आहे. जिथे ही घटना घडली ती दादरी ही उत्तर प्रदेशात येते, त्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार निकामी व षंढ आहे असे म्हणावे लागेल. असे कुचकामी सरकार असल्यामुळे उत्तर प्रदेशची कायदा-सुव्यवस्था ढासळून तेथे अराजक निर्माण झाले आहे आणि त्यातूनच दादरीसारख्या घटना घडवून दोन धर्मांत तणाव निर्माण होत आहे. दादरी प्रकरण इतके झोंबले असेल तर आझम खान यांनी प्रथम मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता व मुख्यमंत्री अखिलेश यादवांचा राजीनामा मागायला हवा,अशी मागणी उद्धव यांनी केली आहे.