‘आझाद हिंद’मध्ये चोरट्यांची लूटमार
By Admin | Updated: March 2, 2016 01:14 IST2016-03-02T01:14:48+5:302016-03-02T01:14:48+5:30
दौंड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसवर मंगळवारी पहाटे चोरट्यांनी दगडफेक करीत प्रवास करणाऱ्या माय-लेकींवर शस्त्राने हल्ला केल्या.

‘आझाद हिंद’मध्ये चोरट्यांची लूटमार
दौंड : दौंड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसवर मंगळवारी पहाटे चोरट्यांनी दगडफेक करीत प्रवास करणाऱ्या माय-लेकींवर शस्त्राने हल्ला केल्या. यात त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्याकडील पर्स व पैसेही चोरले. या प्रकाराने रेल्वे प्रवासी धास्तावले होते.
एस ५ या बोगीतून या दोघी प्रवास करीत होत्या. संपा सिन्हा (वय ५४), सामिया सिन्हा (वय २५, दोघीही रा. मालवीयनगर, चिरीमिरी, जि. कोरिया, छत्तीसगड) अशी जखमी महिलांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या माय-लेकींवर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आझाद हिंद एक्स्प्रेस दौंड स्थानकात येण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सिग्नलवर थांबविण्यात आली होती. या बोगीत एका बाजूला असलेल्या दोन खिडक्यांजवळ माय-लेकी झोपलेल्या होत्या. खिडक्यांच्या काचा उघड्या होत्या.
या खिडकीतून अज्ञात व्यक्ती पर्स ओढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रतिकार करीत पर्स हाताने दाबून धरली. चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने माय-लेकींच्या हातांवर वार केले आणि पर्स घेऊन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वेवर तुफानी दगडफेक केली.
या परिसरात रेल्वे बराच वेळ थांबून होती. मात्र पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी वेळेवर आले नाहीत.
जखमी झालेल्या या दोन्ही माय-लेकी मदतीची याचना करीत होत्या. काही वेळाने गाडी रेल्वे स्थानकात आली, तेव्हा प्रवास करणारे प्रतीक साळुंके, आनंद ओव्हाळ, विश्वजित पाचपुते या तिघांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी पुढील प्रवास रद्द करून या माय-लेकींना रेल्वेस्थानकात उतरविले. त्यानंतर रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन
घटनास्थळी आले.
रेल्वेचे डॉ. संजीव यांनी रेल्वे स्थानकात प्राथमिक उपचार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या दोघी महिलांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम पवरे आणि पोलिसांनी घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. श्वानपथकाने दाखविलेल्या दिशेनुसार घटनास्थळापासून काही अंतरावर पर्समधील एटीएम कार्ड मिळाले. पुढे काही अंतरावर पर्स मिळाली. पर्समध्ये मोबाईल, महत्त्वाची कार्डे आणि ३५० रुपये होते. (वार्ताहर)1 हातावर वार झाल्यानंतर संपा सिन्हा या बेशुद्ध पडल्या. त्यांची मुलगी सामिया मदतीची याचना करीत होती. गाडी रेल्वेस्थानकात आली. तेव्हा प्रतीक साळुंके, आनंद ओव्हाळ आणि विश्वजित पाचपुते यांनी या दोन्ही महिलांना रेल्वेगाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरविले. मदतीला धावून आलेले युवक दुपारपर्यंत या माय-लेकींसोबत दवाखान्यात होते. तसेच प्रतीक साळुंके या विद्यार्थ्याची बी. एस्सी. भाग एकचा पुण्याला पेपर होता. मात्र पेपर बुडवून त्याने सामाजिक बांधिलकी जोपासली.सामिया सिन्हा हिचा कोथरुड येथील इंटरनॅशनल फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण झाला आहे. भाडेतत्त्वावर घेतलेले घर सोडून सामान घेऊन या माय-लेकी पुन्हा छत्तीसगड येथे जाणार होत्या. मात्र त्यांच्या जिवावर ही दुर्दैवी घटना बेतली. या वेळी सामिया म्हणाली, ‘‘बोगीतील एकही प्रवासी मदतीला आला नाही. काही चोरटे आमच्या हातावर वार करीत होते. काही जण रेल्वे बोगीवर दगडफेक करीत होते.’’