म्हणे आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते! डॉक्टरांचा फंडा; नागरिकांची दिशाभूल
By Admin | Updated: July 3, 2014 23:09 IST2014-07-03T22:40:39+5:302014-07-03T23:09:13+5:30
लहान बालक ांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन दिल्यास भूतबाधा दूर होत असल्याचा प्रसार केला जात आहे.

म्हणे आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते! डॉक्टरांचा फंडा; नागरिकांची दिशाभूल
अकोला : देवापेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवणार्या खुद्द डॉक्टरांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान बालक ांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन दिल्यास भूतबाधा दूर होत असल्याचा प्रसार केला जात आहे. शहरातील एका डॉक्टरचा हा फंडा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान असून, या बाबीची गंभीर दखल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांनी घेतली आहे.
पुष्प नक्षत्राच्या मुहूर्तावर लहान बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरातील एका डॉक्टरने २७ जुलै ते २ मार्च २०१५ पर्यंत आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुवर्ण प्राशनाचे प्रचंड फायदे असल्याचे मनावर बिंबवल्या जात असल्याचे समोर आले. शून्य ते १२ वयोगटातील मुलांना सुवर्ण प्राशन दिल्यास त्यांची बुद्धी, बल, आयुष्य, वीर्य व वर्ण वाढत असल्याचा दावा केला आहे. यातही कहर म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांच्या अंधश्रद्धेला चालना देत सुवर्ण प्राशनामुळे लहान मुलांमधील भूतबाधा दूर होऊन पुण्याचा लाभ होत असल्याचा प्रसार केल्यामुळे संबंधित डॉक्टरांचे शिबिर वादाच्या भोवर्यात सापडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. १० रुपये नोंदणी शुल्क आकारून औषधी सेवनासाठी ४० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. अवघ्या ४० रुपयांत आयुर्वेदिक औषधीच्या सेवनामुळे भूतबाधा दूर होत असल्याच्या प्रसाराने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची सुशिक्षित डॉक्टरांकडूनच ऐशीतैशी होत आहे. या गंभीर प्रकाराची महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून, ही नागरिकांची शुद्ध फसवणूक असल्याचे मनपाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी स्पष्ट केले.
** पदवीचा उल्लेख टाळला
आयुर्वेदिक औषधी देण्याचा अधिकार फक्त आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनाच आहे. हा प्रसार करणार्या डॉक्टरांनी मात्र त्यांच्या पदवीचा उल्लेख टाळला, हे येथे उल्लेखनीय.
** आयुर्वेदाचार्य डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधी देण्याचे अधिकार आहेत. सुवर्ण प्राशनामुळे भूतबाधा दूर होण्याचा प्रकार विचित्र वाटतो. आम्ही यापूर्वीसुद्धा अशा स्वरूपाच्या सुवर्ण प्राशन शिबिरांचा घोळ उघडकीस आणला होता. सुवर्ण प्राशन शिबिराला मनपाची मान्यता नाही. ही शुद्ध नागरिकांची फसवणूक असून, प्रकार घडल्यास निश्चित कारवाई केल्या जाईल.
-डॉ. फारुख शेख, निवासी वैद्यकीय अधिकारी, मनपा