अयाज सुल्तान गेला इसिसमध्ये?

By Admin | Updated: January 6, 2016 02:08 IST2016-01-06T02:08:36+5:302016-01-06T02:08:36+5:30

मालवणीतून ३० आॅक्टोबरपासून गायब असलेला अयाज सुल्तान हा २३वर्षीय तरुण थेट इसिसमध्ये सामील झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Ayaz Sultan went to Isis? | अयाज सुल्तान गेला इसिसमध्ये?

अयाज सुल्तान गेला इसिसमध्ये?

डिप्पी वांकाणी,  मुंबई
मालवणीतून ३० आॅक्टोबरपासून गायब असलेला अयाज सुल्तान हा २३वर्षीय तरुण थेट इसिसमध्ये सामील झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी अयाजविरुद्ध महाराष्ट्र एटीएसने गुन्हा दाखल केला असून, अयाज हा सध्या इसिसच्या अफगाणमधील गटात असल्याचेही सांगितले जात आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, इसिसचे सहकार्य असलेल्या एका गटात अयाज सामील झाला असल्याचा संशय आहे. अयाजच्या मोबाइल रेकॉर्डवरून असे दिसून येते की, अयाजने मोबाइल फोनवरून इसिसशी संबंधित अनेक व्हिडीओ डाउनलोड केले होते. त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांनाही तो कट्टरपंथी बनविण्याच्या प्रयत्नात होता.
अयाज हा इराकमध्ये दाखल होण्यासाठी इराणमार्गे गेला असावा असा अंदाज बांधला जात आहे. पण, आम्हाला असे वाटते की, तो अफगाणिस्तानमध्येच इसिसच्या गटात सहभागी झाला असावा. तो थेट सीरियातील युद्धात सहभागी झाला नसेल, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, इसिसने आपले गट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सक्रिय केले आहेत; तर अफगाणिस्तानात अल कायदाने इसिससोबत हातमिळवणी करीत अफगाणमधील अन्य गटासोबत लढण्याची तयारी केली आहे. अयाज अफगाणिस्तानात इसिसच्या अशाच एका गटात सहभागी झाला असल्याचा संशय आहे. त्यामुळे अयाज हा इसिसमध्ये भारताविरुद्धच्या आॅपरेशनमध्ये सहभागी झाला की काय? याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
अयाजला इसिसमध्ये सहभागी करून घेण्यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता या अधिकाऱ्याने सांगितले की, देश सोडून जाण्यापूर्वी अयाजने त्याच्या आॅनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी थांबविल्या होत्या. तथापि, अयाजच्या संपर्कात कोण होते? याचा तपास आम्ही करत आहोत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अयाजविरुद्ध गुन्हा दाखल केला याचा अर्थ असा नाही की, तो दोषी आहे. वाजिद शेख आणि नूर मोहम्मद या दोघांनी सांगितले की, अयाज हा नेहमी इसिसबद्दलच बोलायचा. इसिसशी संबंधित व्हिडीओ दाखवायचा. तुम्ही दोघे लपून राहा, असा सल्लाही मोहसीननेच दिला होता, असेही या दोघांनी सांगितले. तर मोहसीन परतण्याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
अयाज परत येऊ इच्छित होता
अरीब माजीदच्या बाबतीत पोलिसांनी तो परत आल्यानंंतरच गुन्हा दाखल केला. मात्र, अयाजविरुद्ध आताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अयाजच्या कुटुंबीयांचेही असे म्हणणे आहे की, अयाज परत येऊ इच्छित होता, पण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अयाज काबूलला अथवा इसिसमध्ये गेला नव्हता हे त्याने सिद्ध केले, तर आम्ही त्याला या गुन्ह्यातून मुक्त करू. दरम्यान, मोहसीन सय्यद हा तरुणही अद्याप फरार आहे. वाजिद शेख आणि नूर मोहम्मद हे दोघे तरुणही त्याच्यासोबत १५ डिसेंबरच्या दरम्यान गायब झाले होते. पण, या दोघांचे नाव इसिसशी जोडले गेल्याने हे दोघे लगेच परत आले.

Web Title: Ayaz Sultan went to Isis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.