पोलीस करणार सुरक्षेबाबत जागृती!
By Admin | Updated: December 8, 2015 01:20 IST2015-12-08T01:20:43+5:302015-12-08T01:20:43+5:30
राज्य पोलीस दलातर्फे प्रतिवर्षी २ जानेवारीला ‘रेझिंग डे’ साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रम, महिला, बालक, अल्पसंख्याक आदी घटकांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस जनजागृती करणार आहेत.

पोलीस करणार सुरक्षेबाबत जागृती!
मुंबई : राज्य पोलीस दलातर्फे प्रतिवर्षी २ जानेवारीला ‘रेझिंग डे’ साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रम, महिला, बालक, अल्पसंख्याक आदी घटकांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस जनजागृती करणार आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत राज्यातील सर्व घटकप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे.
केंद्र सरकारने २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘रेझिंग डे’ घोषित केला आहे. त्यानिमित्ताने २ ते ८ जानेवारी या कालावधीत प्रत्येक आयुक्तालय व अधीक्षकाच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक वृद्धाश्रम, महिला मदत केंद्राला भेट देऊन त्यांच्यात सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास वाढवावा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, सुरक्षितेबाबत रॅली काढावी, त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यातील हद्दीतील शाळेतील प्रभारी अधिकाऱ्याने भेट देऊन विद्यार्थ्यांना खात्याच्या कामाबाबत माहिती द्यावी. या सर्व घटकांना पोलिसांच्या कामाची पद्धत, नियंत्रण कक्ष, हत्याराबाबत माहिती द्यावी, निबंध व चित्रकलेच्या स्पर्धांचे आयोजन करावे, त्याचप्रमाणे नागरिकांना सुरक्षितेबाबत मार्गदर्शन करणारी होर्डिंग लावावीत, अशा सूचना महासंचालक दीक्षित यांनी केल्या आहेत.
त्याबरोबरच अन्य विधायक कार्यक्रम घ्यावेत, जेणेकरून नागरिकांना पोलिसांबाबत आपुलकी निर्माण होईल आणि ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर राहतील, असे दीक्षित यांनी म्हटले.