‘लोकमत’ची जागृती अन् सातारकरांचा उठाव
By Admin | Updated: November 3, 2014 23:26 IST2014-11-03T22:15:34+5:302014-11-03T23:26:44+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : गुंडगिरीच्या विरोधात वीस संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उतरले रस्त्यावर!

‘लोकमत’ची जागृती अन् सातारकरांचा उठाव
सातारा : ‘आलिशान वातानुकूलित कार्यालयात बसून कामकाज पाहणारे कधीही रस्त्यावर उतरत नाहीत,’ अशी टीकाटिपण्णी करणाऱ्यांना सोमवारी बिल्डरांनी चोख उत्तर दिलं. वाढत्या गुन्हेगारीविरोधात ‘लोकमत’नं जनजागृती केल्यानंतर बिल्डर्ससह शेकडो सातारकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली.
साताऱ्यात वाढत चाललेली गुंडगिरी, दहशत आणि खंडणीबहाद्दरांची संघटित टोळकी यामुळे सातारा शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर्स, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व अन्य क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांना या गुंडांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. दादागिरी व भाईगिरी करणाऱ्यांनी आता खंडणी मागण्याचे प्रकार सुरू केले असून खंडणी न दिल्यास मारहाण, अॅट्रॉसिटी, विनयभंगाच्या खोट्या केसेस दाखल करून बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या संघटित गुन्हेगारांचा मोका किंवा तत्सम कलमे लावून कायमचा बंदोबस्त करावा तरच सातारकर शांततेने व सुरक्षित राहू शकतील, असे आवाहन सातारा शहरातील विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना करण्यात आले.
सातारा शहरातील वाढत्या गुंडगिरीला रोखण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बिल्डर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष नीळकंठ जोशी, राष्ट्रीय संघटक प्रताप साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोळ, बिल्डर्स असोसिएशनचे पुणे, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, फलटण, बारामती, वाई शाखांचे पदाधिकारी तसेच खेड, धनगरवाडी, वाढे, संभाजीनगर, सत्वशीलानगर, सैदापूर, संगममाहुली, वर्ये-रामनगर ग्रामपंचायतींचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास जगताप यांनी सांगितले की, बिल्डर्स असोसिएशनच्या अनेक सदस्यांना सध्या भीती, दशहत व दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या केसेसमुळे जगणे मुश्किल झाले आहे. हे गुन्हेगार एक विशिष्ट गुन्ह्याचा प्रकार सर्वत्र वापरत आहेत. याची जाण पोलीस खात्यालाही आहे. पोलिसांकडून चांगले सहकार्य मिळाले आहे; परंतु गुन्ह्याचा प्रकार व सातत्याने होत असलेले निर्भीड गुन्हे यावर काहीतरी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून सातारातील नागरिक निर्भीडपणे व्यवसाय करू शकतील. अशा घटना किंंवा खंडणी, गुंडगिरी अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसात द्यायला गेल्यावर आपल्यावरच अॅट्रॉसिटी, विनयभंगाच्या खोट्या केसेस दाखल होतात. असे प्रकार यापूर्वी साताऱ्यात होत नव्हते. पण आता वरचेवर घडू लागलेल्या आहेत. खंडणीबहादरांवर त्वरित कारवाई करावी, असे आवाहन जगताप यांनी केले. (प्रतिनिधी)
‘खंडणीविरोधी टास्क फोर्स’ स्थापण्याची मागणी
आज हा प्रकार बांधकाम व्यवसायिकांविरूध्द वाटत असला तरी हा प्रकार समाजातील इतरही घटकांपर्यंत पोहचू लागला असून याची अनेक उदहारणे आज आहेत. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलीस खात्याकडून संबंधित गुन्हेगारांवर कायमस्वरूपी कारवाई करावी यासाठी संघटित गुन्हेगारी (मोका) किंंवा तत्सम कायद्यांचा आधार घ्यावा, तसेच विशेष तपासणी पथका (स्पेशल इनव्हेस्टिगेशन फोर्स)ची स्थापना करून खंडणीबहादरांवर त्वरित कारवाई करावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष रामदास जगताप यांनी केली.
अशी मागितली जाते खंडणी
फोन करून भेटायला बोलावले जाते
प्लॉट असेल तर गुंठ्याला एक लाख आणि फ्लॅट असेल तर दोन लाख रुपयांची मागणी केली जाते
कुणी भेटायला गेले नाही तर सुरक्षारक्षकाजवळ चिठ्ठी दिली जाते
तरीही कोणी प्रतिसाद दिला नाही तर ‘साईट’वर सुरक्षारक्षकाला मारहाण केली जाते
कार्यालयाची तोडफोड केली जाते
पोलिसात तक्रार केली तर उलट बिल्डरवर विनयभंग, अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले जातात
आजपर्यंत एवढे अन्याय झाले; पण आम्ही कधी एकत्र येत नव्हतो. मात्र ‘लोकमत’सारखं मोठं माध्यम आमच्या पाठीशी असल्यामुळं आता आम्हाला बळ मिळालं आहे. गुंडगिरीविरोधातील लढाई जिंकूनच दाखवू.
- अजय शिराळ,
बांधकाम व्यावसायिक
‘लोकमत’नं परखड भूमिका घेऊन चांगली सुरूवात करून दिली आहे. बांधकाम व्यावसायिकांना खंडणीबहाद्दरांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल कोणीच बोलत नव्हतं. आता सर्वजण एकत्र आलेत. ही एकी टिकून राहावी.
- उपेंद्र पंडित, अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशन्
गुंडगिरीचा कायमचा बंदोबस्त करणार : जिल्हाधिकारी
गुंडगिरीचे व दहशतीचे हे प्रकार खरोखरच गंभीर असून नागरिकांनी या गुंडांविरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी कोणतीही भीती न बाळगता पुढे आले पाहिजे, तरच संघटित गुन्हेगारीविरोधात प्रशासनाला भक्कम पावले उचलता येतील. येत्या काही दिवसातच अशा प्रकारची गुंडगिरी करणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बिल्डरांना दिले. ा
‘लोकमत’च्या परखड भूमिकेची चर्चा
शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात बिल्डरांसह सुमारे वीस संघटनांचे शेकडो पदाधिकारी, सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी केबिनमध्ये चर्चा सुरू होती. कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या गर्दीत अनेकजण ‘लोकमत’ने याबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत कौतुक करत होते.
उद्योजकांना पोलीस संरक्षण देणार : पोलीस अधीक्षक
गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त केसेस दाखल करणे आवश्यक आहे. गुंडांनी केलेल्या खोट्या तक्रारीमुळे संपूर्ण कुटुंबाला नाहक त्रास सोसावा लागत आहे; पण पोलीस प्रशासन आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. ज्या उद्योजकांना खंडणीच्या किंंवा मारहाणीच्या धमक्या येत आहेत त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल. तसेच कामाच्या ठिकाणीही पोलीस संरक्षण दिले जाईल. कोणाच्याही बाबतीत असा प्रकार घडला तर घाबरून न जाता संबंधिताने तक्रार दाखल करावी आम्ही तातडीने संबंधितावर गुन्हे दाखल करू. तसेच दहशतीला आळा बसवण्यासाठी विशेष पथक तयार करून या गुंडांचा बंदोबस्त करण्यात येईल.
उद्योजकांनी मांडल्या व्यथा
औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकही या गुन्हेगारीला आता कंटाळले असून कित्येक उद्योजक आता सातारा सोडून अन्य शहरांमध्ये स्थलांतरित होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. या गुन्हेगारांना वेळीच लगाम घालून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गुंडगिरीच्या दुष्ट चक्रात भरडले गेलेले बांधकाम व्यावसायिक विजय शिंंदे, सचिन जाधव यांनी आपली व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
सातारा येथे सोमवारी बिल्डर्स असोसिएशन व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
वीस संघटनांचे शेकडो पदाधिकारी एकवटले
बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया
सातारा शाखा
क्रिडाई सातारा शाखा
आर्किटेक्ट असोसिएशन
आयआयआयडी असोसिएशन
इंडियन मेडिकल असोसिएशन
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
प्लायवुड असोसिएशन
बस, ट्रक, लक्झरी वाहतूक संघटना
हॉटेल असोसिएशन
रोटरी क्लब
लायन्स क्लब
लॉयर्स असोसिएशन
व्यापारी संघटना
ठेकेदार-लेबर असोसिएशन
विसावा नाका व्यापारी संघटना
बॉम्बे रेस्टॉरंट चौक
कृष्णानगर व्यापारी संघटना
स्टोन क्रशर संघटना
प्लंबिंंग हार्डवेअर असोसिएशन
सराफ असोसिएशन व अन्य संघटनांनचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.