प्रबोधन सूर्याचा अस्त!

By Admin | Updated: February 22, 2015 02:37 IST2015-02-22T02:37:13+5:302015-02-22T02:37:13+5:30

कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Awakening the sunset! | प्रबोधन सूर्याचा अस्त!

प्रबोधन सूर्याचा अस्त!

लाल सलाम : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात अलोट गर्दी
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील पितामह आणि सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम केला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रबोधनाच्या चळवळीतील सूर्यही लुप्त झाला. अंत्यसंस्कारास जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी मुठी आवळल्या. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे को लाल सलाम़़़ लाल सलाम’ अशी आरोळी दिली. आपले लाडके अण्णा आता पुन्हा कधीच भेटणार नाहीत, या भेसूर सत्याने अनेकांचा अश्रंूचा बांध फुटला.
१६ फेब्रुवारीला कोल्हापुरात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात कॉ. पानसरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या होत्या. कोल्हापुरात उपचार केल्यानंतर शुक्रवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची शुक्रवारी रात्री प्राणज्योत मालवली. पानसरे यांच्या निधनाची बातमी येथे पोचली व अवघे कोल्हापूर शोकसागरात बुडाले. सकाळी त्यांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्यात आले. गेली ६५ वर्षे कोल्हापूरसह राज्यातील रस्त्यांवर संघर्ष करणारा आपला नेता निस्तेज पडलेला पाहून जनसमुदायाला हुंदका आवरता आला नाही.

सरकारी अनास्थेचा कळस
कॉ. पानसरे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमधून मुंबई विमानतळावर आणण्यात आले, पण तिथे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याव्यतिरिक्त कोणताही सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. शिवाय जवळपास एक तास पार्थिव विमानतळावरच रखडले. स्क्रिनिंगसाठी पैसे मागितले गेले. हा सगळा प्रकार संतापजनक होता, असे आमदार कपिल पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र बंदची हाक
कॉ. पानसरे यांच्या निधनानंतर भाकपासह सर्व डाव्या संघटनांनी उद्या, रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, भारिप-बविआ, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

खास विमानाने पार्थिव कोल्हापुरात
कॉ़ पानसरे यांचे पार्थिव दुपारी साडेबाराला खास विमानाने कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे आणण्यात आले. तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाकपाचे नेते भालचंद्र कांगो यांनी दसरा चौकात पार्थिव आणले. भाकपाचे राष्ट्रीय महासचिव क ॉम्रेड सुधाकर रेड्डी, सहसचिव शमी फैजी, कांगो यांनी पानसरे यांच्या पार्थिवावर पक्षाचा लाल ध्वज घातला. - विशेष पान/१०

अंत्ययात्रा नव्हे, संघर्षयात्रा!
दुपारी सव्वातीनला अंत्ययात्रा सुरू झाली. हातात लाल ध्वज घेतलेले असंख्य कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. पक्षाच्या नेत्यांनी ही अंत्ययात्रा नव्हे, तर एक संघर्षयात्रा असेल, असे जाहीर केले. या अंत्ययात्रेत आणि त्यानंतरच्या शोकसभेत सर्वच वक्त्यांनी मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने मुख्यमत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
सायंकाळी सव्वासहा वाजता पानसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पानसरे यांच्या कन्या स्मिता आणि सून मेघा यांनी चितेला मुखाग्नी दिला.

व्यवस्थेवरचा हल्ला
कॉ. पानसरेंवरील हल्ला हा कोणा व्यक्ती वा विचारांवर नसून, तो व्यवस्थेवरचा हल्ला व आव्हान आहे. हे आव्हान मोडीत काढण्यास सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Awakening the sunset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.