अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील तपासात टाळाटाळ
By Admin | Updated: June 30, 2016 01:22 IST2016-06-30T01:22:44+5:302016-06-30T01:22:44+5:30
सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव यांची चौकशी करून त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पाठविण्यात यावा

अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील तपासात टाळाटाळ
पुणे : शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनमधील भास्कर गायकवाड यांच्यावर अत्याचार झाल्याच्या गुन्ह्यात आरोपीला वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव यांची चौकशी करून त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पाठविण्यात यावा, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात आले आहेत़
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अॅट्रॉसिटी उच्चाधिकार समितीचे सदस्य चंद्रकांत खिलारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडे तक्रार केली होती़ भास्कर गायकवाड शिवाजीनगर येथील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन येथे नोकरीला आहेत़ त्यांच्यावर अत्याचार झाल्याप्रकरणी संतोष खुळे यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे़ त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने यांच्याकडे सोपविण्यात आला होता़
गायकवाड यांनी आरोपींना शिक्षेपासून वाचविण्यासाठी योग्य प्रकारे तपास करीत नसल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ अन्वये कारवाई करावी, अशी विनंती चंद्रकांत खिलारे यांच्याकडे
केली़
त्यांनी केलेल्या तपासात जाधव यांनी जाणूनबुजून गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई करून, त्रुटी निर्माण करीत होत्या़ तरतुदीनुसार
योग्य कलम नोंदविण्याची टाळाटाळ केली़ (प्रतिनिधी)