गणेशोत्सवात वीज विघ्न टाळा

By Admin | Updated: September 5, 2016 04:53 IST2016-09-05T04:53:24+5:302016-09-05T04:53:24+5:30

गणेशोत्सवात मंडळांकडून जनरेटर्सचा वापर केला जातो. अशावेळी वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो.

Avoid the power crisis in the Ganesh Festival | गणेशोत्सवात वीज विघ्न टाळा

गणेशोत्सवात वीज विघ्न टाळा


मुंबई : गणेशोत्सवात मंडळांकडून जनरेटर्सचा वापर केला जातो. अशावेळी वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू करण्यात येतो. मात्र एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असतील याची काळजी सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवात घ्यावी, असे आवाहन बेस्टसह महावितरणने केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृत तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे कर्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी कोणत्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा ठिकाणी वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोशणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित, धोकाविरहित असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी वीजवाहक तारा विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी मंडळांनी घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
>विजेची चोरी करू नका
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वीज चोरीच्या मोहात पडू नये. अधिकृतरीत्या वीज घ्यावी. अनधिकृतरीत्या वीजपुरवठा घेतल्यास अपघात होण्याची भीती आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास दोष निवारण कक्षाशी संपर्क साधावा.
>सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्या
महावितरणने सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी घरगुती दरांपेक्षाही कमी म्हणजे प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर आहेत. परिणामी, आयोजकांनी उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे.
वीजमीटर सुरक्षित ठेवा
वीजपुरवठ्यासाठी तात्पुरत्या वीजमीटरची पेटी पाण्यापासून सुरक्षित राहील, अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीच्या देखभालीसाठी एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करता येईल. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्या.

Web Title: Avoid the power crisis in the Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.