अविनाश वारजूकरांना अटकपूर्व जामीन
By Admin | Updated: September 28, 2016 20:51 IST2016-09-28T20:51:30+5:302016-09-28T20:51:30+5:30
नागपूर खंडपीठाने बुधवारी काँग्रेसचे चिमूर येथील माजी आमदार अविनाश वारजूकर यांना बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अविनाश वारजूकरांना अटकपूर्व जामीन
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी काँग्रेसचे चिमूर येथील माजी आमदार अविनाश वारजूकर यांना बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी २७ जुलै २०१६ रोजी वारजूकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (बलात्कार) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. तक्रारीनुसार, वारजूकर यांचे पीडित महिलेच्या कुटुंबासोबत घरोब्याचे संबंध होते. याचा फायदा वारजूकर यांनी घेतला. ८ नोव्हेंबर २०१५ रोजी पीडित महिला मैत्रिणीसोबत भंडारा येथील हॉटेलमध्ये गेली होती.
वारजूकर यांनी या हॉटेलमध्ये पीडित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला. यानंतर त्यांनी महिलेला स्वत:च्या कारमध्ये बसवून पेंच येथील रिसॉर्टमध्ये नेले व तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. महिलेने याची माहिती कुटुंबीयांना दिली असता त्यांनी बदनामीच्या भीतीमुळे पोलिसांकडे तक्रार केली नाही. यानंतर वारजूकर यांनी महिलेला एसएमएस पाठविणे व कॉल करणे सुरू केले. दरम्यान, त्यांनी महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.