लेखकांच्या ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरुच!
By Admin | Updated: October 15, 2015 02:32 IST2015-10-15T02:32:47+5:302015-10-15T02:32:47+5:30
देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला

लेखकांच्या ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरुच!
मुंबई : देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला.लोकशाहीर संभाजी भगत, उर्मिला पवार, मुकुंद कुळे आणि लेखक इब्राहिम अफगाण यांनी सरकारकडे पुरस्कार परत पाठवले.
साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी मंगळवारी सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यापाठोपाठ इब्राहिम अफगाण यांनी साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार आणि कुळे यांनी राज्य शासनाचे दोन पुरस्कार परत केले आहेत. तर सरकारवर असहिष्णुतेचा ठपका ठेवत लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘नागरिक’ चित्रपटासाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार परत करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी यशवंत चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे.
साहित्य अकादमीने २०१३ साली शायर निदा फाजली यांच्या ‘दिवारों के बीच’ या उर्दूतील आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या ‘हाक’ या मराठी अनुवादासाठी इब्राहिम अफगाण यांना पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार परत करत असल्याचे अफगाण यांनी जाहीर केले. देशातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध कलाकार आणि लेखकांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर होत असलेली अभिव्यक्ती, स्वातंत्र्याची गळचेपी, विचारवंताच्या हत्या आणि एकूणच इतिहासाची प्रतिगामी मांडणी या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निषेध व्यक्त करत पुरस्कार परत केल्याची भावना मुकुंद कुळे यांनी व्यक्त केली.
पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर संघाची टीका
नागपूर : पुरोगामी विचारवंतांची हत्या व दादरी येथील घटना तसेच देशातील वाढती असहिष्णुता यांचा निषेध व्यक्त करीत पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका करून मोदी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. साहित्यिक जाणूनबुजून असे पाऊल उचलत असून साहित्याच्या आडचे हे राजकारण असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. या साहित्यिकांनी देशासोबतच साहित्यप्रेमींचा अपमान केला असल्याचे संघाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांगलादेशच्या साहित्यिक तस्लीमा नसरीन यांचे शीर आणून देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा करण्यात आली, गोधरामध्ये निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, यावेळी हे साहित्यिक कुठे गेले होते, असा प्रश्न संघाकडून करण्यात आला आहे.