अधिका-याकडे पावणेचार कोटींचे घबाड
By Admin | Updated: March 10, 2015 04:08 IST2015-03-10T04:08:49+5:302015-03-10T04:08:49+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागातील शिपाई महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिलाच प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाखांची

अधिका-याकडे पावणेचार कोटींचे घबाड
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागातील शिपाई महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिलाच प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाखांची लाच देताना पकडलेले निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्या ऐरोलीतील घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी छापा टाकला. या छाप्यात आठ लाख ९२ हजार ३२० रुपयांची रोख व तीन कोटी ६७ लाख ५० हजार १९० रुपयांची मालमत्ता आढळली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय मोहिते यांच्या पथकाने ९ मार्च रोजी दिवसभर त्यांच्या ऐरोलीतील निवासस्थानी तसेच परळी वैजनाथ येथील पिंपळगाव या त्यांच्या मुळगावी धाड टाकून ही मालमत्ता उघडीस आणली. ऐरोलीतील घरझडतीत आठ लाख ९२ हजार ३२० ची रोकड तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ४४ लाख ४३ हजार १८०च्या २ सदनिका याव्यतिरिक्त एक कोटी ६० लाख ७२ हजार ७०६ चे एक सलून आणि दोन गाळयांची कागदपत्रे मिळाली. पिंपळगाव येथे ८ लाख ७० हजारांची एक हेक्टर शेतजमीन, ५३ हजारांचे दोन भूखंड, ऐरोलीच्या एचडीएफसी बँकेतील ४३ लाख ३५ हजारांच्या ठेवीच्या पावत्याही मिळाल्या. वेगवेगळया बँकांत त्यांच्या नावे ८३ हजार ९८४ रुपये जमा असलेले खाते पुस्तक आणि एलआयसीच्या पावत्या अशी तीन कोटी ६७ लाखांची कागदपत्रे मिळाली. तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्य घटनेत कल्याणच्या महावितरण कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.