औरंगाबादचा धान्य अडत बाजार उद्या उघडणार
By Admin | Updated: July 20, 2016 19:30 IST2016-07-20T19:30:24+5:302016-07-20T19:30:24+5:30
तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेल्या जाधववाडी कृउबा येथील धान्याचा अडत बाजार अखेर उद्या गुरुवार २१ रोजी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याचा राज्यशासनाच्या

औरंगाबादचा धान्य अडत बाजार उद्या उघडणार
१३ दिवसानंतर बेमुदत बंद मागे : शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याच्या अध्यादेशाचे व्यापारी पालन करणार
औरंगाबाद- तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेल्या जाधववाडी कृउबा येथील धान्याचा अडत बाजार अखेर उद्या गुरुवार २१ रोजी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याचा राज्यशासनाच्या अध्यादेशाचे पालन करण्याचे अडत्यांनी ठरविले आहे. मात्र, खरेदीदाराकडून किती अडत घ्यायची यावर अडत्यांमध्ये मतभेद अजूनही कायम आहे.
धान्याची हर्राशी झाल्यावर अडते शेतकऱ्यांकडून ३ टक्के अडत वसूल केली जात असत. मात्र, अन्य राज्यात ही अडत खरेदीदाराकडून वसूल केली जाते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी राज्यसरकारने अध्यादेश काढून. कृउबा समितीअंतर्गत शेतकऱ्यांनी धान्य,कडधान्य विकल्यास त्यावरील अडत त्यांच्या ऐवजी खरेदीदाराकडून अडत वसूल करावी,असे आदेशात म्हटले होते. मात्र, यास विरोध करीत अन्य बाजार समितीप्रमाणे येथील अडत्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. बंदला १३ दिवसपूर्ण झाले तरीही सरकार मात्र, आपल्या अध्यादेशावर ठाम होते. यामुळे अखेर अडत्यांना अध्यादेश मान्य करावाच लागला. बुधवारी याबाबत जाधववाडीतील मार्केट यार्डात अडत्यांची बैठक झाली. यात राज्यातील अन्य बाजार समितीमधील अडत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोबाईलवर मते जाणून घेण्यात आली. खरेदीदाराकडून किती आडत घ्यायची यावर मात्र, अडत्यांमध्ये मतभेद असल्याचे आढळून आले. कोणी ३ टक्के तर कोणी अडीच टक्के अडत घ्यावी असे मत मांडत होते. अडत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र, यावर सहमती झाली नाही. शेतीमालाची रक्कम २० ऐवजी ९ दिवसात खरेदीदाराने अडत्याला द्यावी, यासंदर्भातही चर्चा सुरु होती. यासंदर्भात औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, आता राज्यसरकारच्या अध्यादेशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांकडून अडत वसूल करणार नाही. मात्र, खरेदीदाराकडून किती आडत घ्यावी, यासंदर्भात अडते व खरेदीदार यांची बैठकी घेऊन त्यात ठरवू. सचिव दिलीप गांधी यांनी सांगितले की, बेमुदत बंद मागे घेतला असून गुरुवारपासून जाधववाडीतील धान्याचा अडत बाजाराला सुरुवात होणार आहे.