औरंगाबादेत गॅस्ट्रोने घातले थैमान
By Admin | Updated: July 10, 2016 02:38 IST2016-07-10T02:38:19+5:302016-07-10T02:38:19+5:30
शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, वाळूज परिसरातील मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोमुळे एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात दररोज

औरंगाबादेत गॅस्ट्रोने घातले थैमान
औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, वाळूज परिसरातील मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोमुळे एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात दररोज गॅस्ट्रोचे ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे; परंतु या आजाराला नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहर आणि परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे शुक्रवारी एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर अन्य आठ बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील विविध भागांमधील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पिण्याच्या पाण्यामध्ये दूषित पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची लागण होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घाटी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये अतिसार, उलट्या, पोटात मुरड येणे यासारख्या तक्रारी असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. बदललेल्या वातावरणामुळे गॅस्ट्रोच्या साथीचा जोर वाढला आहे. याविषयी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास जगताप म्हणाले, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. (प्रतिनिधी)
९ दिवसांत २८ रुग्ण
घाटी रुग्णालयात महिनाभरात गॅस्ट्रोच्या १८८ रुग्णांनी उपचार घेतले. तर जुलै महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ रुग्ण दाखल झाले.