औरंगाबादेत १४ कोटींचा घोटाळा
By Admin | Updated: August 22, 2015 23:32 IST2015-08-22T23:32:53+5:302015-08-22T23:32:53+5:30
अण्णा भाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा राज्यभर गाजत असताना येथील महापालिकेच्या प्रकल्प विभागातही तब्बल १४ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याची खळबळजनक

औरंगाबादेत १४ कोटींचा घोटाळा
- मुजीब देवणीकर, औरंगाबाद
अण्णा भाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा राज्यभर गाजत असताना येथील महापालिकेच्या प्रकल्प विभागातही तब्बल १४ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना मिळणारे प्रत्येकी दोन लाख रुपये बोगस लाभार्थी दाखवून उचलण्यात आले आहेत.
१९९७ मध्ये केंद्र शासनाने सुवर्ण जयंती रोजगार योजना सुरू केली होती. त्यात केंद्राकडून ७० टक्के निधी, राज्य शासनाकडून २५ तर लाभार्थ्याकडून ५ टक्के त्याचा हिस्सा धरुन २ लाख रुपये देण्यात येत होते.
योजनेतील लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील बेरोजगार असावा, अशी अट होती. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेला केंद्र आणि राज्य शासनाकडून तब्बल १४ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. त्यावर दलालांनीच डल्ला मारत बोगस लाभार्थी दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०१४ मध्ये शासनाने सुवर्ण जयंती योजनेचे नाव बदलून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान असे नामकरण केले. यंदा पालिकेला २ कोटी ५७ लाख रुपयांचा भरघोस निधीही मिळाला.
मात्र यासाठी दुसरीच मंडळी सरसावली. महापालिकेच्या प्रकल्प विभागात बोगस फाईली मंजूर करून घेण्यासाठी सकाळी ८ वाजेपासून काही मंडळी सरसावलेली असतात. महापालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब माहीत असली तरी राजकीय भीतीपोटी प्रत्येक जण शांत बसले आहेत.
पारदर्शकतेला बगल
- दरवर्षी योजनेत ३०० पेक्षा अधिक बेरोजगारांना लाभ दिल्याचे दाखविण्यात येते. लाभार्थींची यादी मनपाने वेबसाईटवर टाकलेली नाही. महापालिकेने दहा वर्षांपूर्वी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. या यादीत अनेक श्रीमंत मंडळींचाही समावेश करण्यात आला होता. यापूर्वी बोगस यादीचा वाद थेट मंत्रालयापर्यंत गेला होता. दलाल मंडळी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे बोगस प्रमाणपत्रही स्वत:हून तयार करतात.
असा आला निधी
२००९-१०
१ कोटी ४४ लाख
२०१०-११
२ कोटी ६ लाख
२०११-१२
१ कोटी ५७ लाख
२०१२-१३
३ कोटी २१ लाख
२०१३-१४
२ कोटी ६० लाख
२०१४-१५
निधी आला नाही
२०१५-१६
२ कोटी ५७ लाख