औरंगाबाद : इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी कोविडविषयक बातम्यांचा अतिरेक थांबवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी ७ मे रोजी खर्चासहित नामंजूर केली.इलेक्ट्रॉनिक माध्यम बातम्या दाखवण्यास स्वतंत्र आहे. सत्य आणि योग्य माहिती प्रसारित करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने याचिका नामंजूर केली. सध्या हिंदी, मराठी आणि इंग्रजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिवसभर कोरोनाविषयी बातम्या दाखवतात. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, कोविडविषयी गैरसमज निर्माण होतात व त्यांचे विचार नकारात्मक बनतात, असे याचिकाकर्ता अमित जैन यांनी याचिकेत म्हटले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यम खोटी बातमी दाखवीत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे नाही. जर एखादी बातमी खळबळजनक आहे असे याचिकाकर्त्यास वाटत असेल तर त्याने ती बातमी पाहू नये, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
कोविड विषयक बातम्यांचा अतिरेक थांबविण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:10 IST