प्रेक्षकांसाठी ‘ब्रम्हा’ थिएटर होणार खुले
By Admin | Updated: May 21, 2016 03:21 IST2016-05-21T03:21:37+5:302016-05-21T03:21:37+5:30
कोकणातील पहिले मल्टिप्लेक्स बनण्याचा मान अलिबागच्या ओम ब्रम्हा विष्णू महेश या सिनेप्लेक्सने सात वर्षांपूर्वीच मिळविला होता

प्रेक्षकांसाठी ‘ब्रम्हा’ थिएटर होणार खुले
अलिबाग : कोकणातील पहिले मल्टिप्लेक्स बनण्याचा मान अलिबागच्या ओम ब्रम्हा विष्णू महेश या सिनेप्लेक्सने सात वर्षांपूर्वीच मिळविला होता. महेश आणि ब्रम्हा या दोन स्क्रीननंतर २७ मे २०१६ पासून तिसरी स्क्रीन सुरु करण्यात येणार आहे. संजय लीला भन्साली यांच्या लाल इश्क...गुपित आहे साक्षीला या सिनेमाने ब्रम्हाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ओम ब्रम्हा विष्णू महेश या सिनेप्लेक्सचे मालक गजेंद्र दळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अलिबागसह मुरुड, रोहे आणि पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने प्रेक्षक पनवेल, वाशी येथील मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी जातात. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा प्रेक्षकांसाठी २७ मेपासून तिसरी स्क्रीन ब्रम्हामध्ये सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रम्हामध्ये एकूण ७० प्रेक्षक सिनेमा बघू शकतात. त्याचे तिकीट दर हे १०० रुपये राहणार आहे.
राज्य सध्या दुष्काळाने होरपळून निघत आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे ब्रम्हाच्या माध्यमातून मिळणारे एक महिन्याचे सर्व उत्पन्न हे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे गजेंद्र दळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)