हसनैनविरुद्ध दाखल होणार अबेटेड समरी चार्जशीट
By Admin | Updated: January 19, 2017 23:40 IST2017-01-19T23:40:46+5:302017-01-19T23:40:46+5:30
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठाण्यातील कासारवडवलीतील १४ जणांचे हत्याकांड करुन स्वत: गळफास घेणाऱ्या हसनैन वरेकर याच्याविरुद्ध ठाणे पोलीस लवकरच ‘अबेटेड समरी चार्जशीट’

हसनैनविरुद्ध दाखल होणार अबेटेड समरी चार्जशीट
- जितेेंद्र कालेकर
ठाणे, दि. 19 - संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठाण्यातील कासारवडवलीतील १४ जणांचे हत्याकांड करुन स्वत: गळफास घेणाऱ्या हसनैन वरेकर याच्याविरुद्ध ठाणे पोलीस लवकरच ‘अबेटेड समरी चार्जशीट’ अर्थात आरोपी सापडला आहे, पण मृत तो मरण पावला आहे, अशी माहिती ठाणे न्यायालयात सादर करणार आहेत. मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून त्याने दिलेल्या औषधांचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतरच हे अबेटेड समरी चार्जशीट ठाणे न्यायालयात दिले जाणार असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाची फाइल बंद केली जाणार नाही. तशी ती करता येणार नाही, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले.
आई, वडील, पत्नी, स्वत:ची दीड वर्षांच्या मुलीसह दोन बहिणी त्यांच्या मुलांना २८ फेब्रुवारी २०१६ मध्ये कासारवडवली गावात हसनैन याने १४ जणांचे कुर्बानी देण्याच्या सुऱ्याने हत्याकांड करुन स्वत:ही आत्महत्या केली होती.
सुबियामुळे उलगडा...
या हत्याकांडाची एकमेव साक्षीदार सुबिया हिच्या प्रसंगावधानामुळे आणि ती बचावल्यामुळे या घटनेतील अनेक प्रश्न सुटले. जर ती वाचली नसती तर या घटनेने आणखी अनेक प्रश्न निर्माण झाले असते, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वडवली गावातील १४ जणांची हत्या करुन स्वत:ची आत्महत्या करण्याचा प्रकार देशभरात पहिल्यांदाच घडला असून या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करण्यााठी सात पथके स्थापन केली होती. तो मानसिक रुग्ण (मल्टीपल पर्सनॅलिटी डिसआॅर्डर) होता. तसेच आर्थिक विवंचनेतून आणि आपल्याच मनोरुग्ण बहिणीबरोबरचे कुकर्म जगासमोर यायला नको, यातूनच त्याने सर्वांची हत्या केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
दावतसाठी मागविलेले पदार्थ आणि शीतपेय तसेच सर्वांच्या रक्ताची तपासणी मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून करण्यात आली. याच तपासणीत हसनैनच्या जठरातील अहवालात कोणत्याही प्रकारचे विष आढळले नाही; तर उर्वरित एक लहान मुलगी, त्याची बहीण आणि त्याचे वडील अन्वर यांच्या अहवालात मात्र बहिणीच्या आजारावरील गुंगी आणणाऱ्या औषधाचा डोस आढळला. उर्वरित मृतदेहाच्या जठर, यकृत तसेच आतडयांमधील अन्नाचा आणि शीतपेयाचा अहवाल अद्यापही न मिळाल्याने ठाणे न्यायालयाला ‘अबेटेड समरी चार्जशीट’ सादर केलेले नाही.
अशी असतात आरोपपत्रे...
- कोणत्याही गुन्ह्यात आरोपीला अटक झाली तर त्याच्याविरुद्ध ठराविक दिवसांमध्ये सबळ पुराव्यासह आरोपपत्र दाखल केले जाते.
- जर आरोपी सापडला असेल, मात्र तो मरण पावला असेल तर अशावेळी अबेटेड समरी चार्जशीट दाखल केली जाते.
- पण गुन्हा खोटा असेल तर मात्र अंतिम अहवाल अर्थात फायनल रिपोर्ट सादर केला जातो. मात्र, कोणत्याही गुन्ह्याची फाईल बंद केली जात नसल्याचे सह पोलीस आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.
सुपारीचा व्यवसाय सुरू करायचा होता...
सुमारे ३५ लाखांच्या उलाढालीतून हुसनैनला सुपारी आयातीचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्याने कोपरखैरणे येथील मेव्हणे शौकत खान यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. तर खासगी पेढीत सोने गहाण ठेवून ८७ हजारांचे कर्जही घेतले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
कर्जबाजारीमुळे विवंचनेत..
क्रूरकर्मा हसनैनने आईच्या माहेरुन मिळालेल्या वाटयातून ३० लाख हडपले होते. शिवाय, वडील अन्वर यांच्या नावावरील आनंदनगर येथील झोपडयाही विकण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. ‘या पैशातून माझे कर्ज फेडू. पण बहिणींना हिस्सा देऊ नका.’ त्याचा हा हट्ट वडिलांना मान्य नसल्याने त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. शेअर मार्केटमध्येही त्याने कोट्यवधी गुंतविले होते, पण या सर्वातूनच तो कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवंचना हेही एक कारण यातून स्पष्ट झाले आहे. मुलींसाठीच विचार करता, असे बोलून वडिलांशी त्याचा नेहमी वाद सुरु असायचा, असेही सुबियाने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.