राष्ट्रीय सणांना हजेरी सक्तीची
By Admin | Updated: August 19, 2014 23:43 IST2014-08-19T22:52:07+5:302014-08-19T23:43:18+5:30
लक्षणीय अनुपस्थिती : राष्ट्रीय सणाचे गांभीर्य नाही

राष्ट्रीय सणांना हजेरी सक्तीची
सागर पाटील - टेंभ्ये -राज्यात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. संपूर्ण राज्यभर हे सण अत्यंत उत्साहात साजरे होतात. परंतु शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील या दिवसांची उपस्थिती मात्र चिंतनीय होत आहे. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी कार्यालयात असणाऱ्या अनुपस्थितीचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी हजेरी पत्रकावर सही सक्तीची मानली जात नाही. त्यामुळे अनेकजणांना हा दिवस म्हणजे सुटीचा दिवस वाटतो.
नुकताच ६८वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. परंतु या दिनाला अपवादात्मक स्थितीमध्येच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. बहुतांश शासकीय कार्यालयांत अधिकारी व मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत होते. हा दिवस ‘नॉन इन्स्ट्रक्शनल डे’ मानला जातो. त्यामुळे कार्यालयातील हजेरी पत्रकावर सही घेतली जात नाही. यावेळचा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आल्याने अनेकजणांनी शनिवारची रजा टाकून जोडून येणाऱ्या सोमवारच्या पतेतीच्या सुटीचा लाभ घेतला. एक रजा टाकून सलग चार दिवस सुटी मिळत असल्याने अनेकांनी वर्षा सहलीचे आयोजन करून पर्यटनाचा आनंद लुटला. त्यामुळे या कालावधीत पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या गर्दीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत होते.
राष्ट्रीय सणांमधून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मुल्यांची रुजवणूक केली जाते. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. याची जाणीव सर्वांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्य दिनाला उपस्थिती आवश्यक आहे. या दिवसांचे रुपांतर सुटीच्या दिवसामध्ये झाल्यास त्यांचे महत्त्व नामशेष होईल.
यामुळे भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या मुल्यांची रुजवणूक करणे अशक्य होईल. राष्ट्रीय सणांचे महत्व टिकून राहावे, यासाठी या दिवसाला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करणे आवश्यक आहे. काही कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाला अन्य ठिकाणी उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे केले जाते. यामुळे संबंधित कर्मचारी ध्वजारोहणाला उपस्थित होता, हे निश्चित होते. एकंदरीत राष्ट्रीय सणांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करण्यासाठी या हजेरीपत्रकांवर सही घेणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
विशेष प्रयत्न सुरू झालेत -शिक्षक १०० टक्के उपस्थित!
राष्ट्रीय सणांना उपस्थित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहिल्यास यामध्ये सर्व स्तरावरील शिक्षक १०० टक्के उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळते. शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचारीदेखील १०० टक्के उपस्थित असतात. शाळांमधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या मुल्यांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय सणाच्या दिवशी अनुपस्थित राहून वर्षा सहलीचा आनंद लुटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करणे अनिवार्य.