लग्नमंडपातच प्रियकराला पेटविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 9, 2016 06:19 IST2016-06-09T06:19:07+5:302016-06-09T06:19:07+5:30
प्रेयसीला अंधारात ठेऊन दुसरीशी विवाह करणाऱ्या प्रियकराला लग्नमंडपातच पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पुसला येथे ६ जून रोजी घडली

लग्नमंडपातच प्रियकराला पेटविण्याचा प्रयत्न
गजानन नानोटकर,
पुसला (अमरावती)- प्रेयसीला अंधारात ठेऊन दुसरीशी विवाह करणाऱ्या प्रियकराला लग्नमंडपातच पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पुसला येथे ६ जून रोजी घडली. विशेष म्हणजे नवरदेवाला पेटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीने स्वत:ही विषप्राशन केले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मध्य प्रदेशातील एका तरूणाचा पुसला येथील तरूणीशी विवाह ठरला होता. ६ जून रोजी ठरल्याप्रमाणे नवरदेव वरातीसह मंडपात आला. त्याच्या प्रेयसीला विवाहाची कुणकुण लागल्याने तिने सोमवारी सकाळी पुसला गाठले. ती येथील बसस्थानकावरच थांबली होती. दुपारी साडेबारा वाजता नवरदेवाचे मंडपात आगमन होताच तरूणी तेथे आली. नवरदेव बोहल्यावर चढताच हातातील दोन बाटल्यांमधील पेट्रोल तिने नवरदेवाच्या अंगावर फेकले. ती नवरदेवाला पेटविणार तेवढ्यात वऱ्हाडी मंडळींनी तिला बाजूला ओढले. त्यामुळे अनर्थ टळला.
घटनेनंतर पोलिसांना पाचारण
करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांनी विवाह टिकविण्याची हमी स्टँप पेपरवर दिल्यानंतर सकाळच्या मुहूर्तातील हा सोहळा रात्री १० वाजता पार पडला. दुपारीच काही वऱ्हाड्यांनी मात्र काढता पाय घेतला होता. (प्रतिनिधी)