लग्नाच्या मांडवात नवरदेवाला पेटविण्याचा प्रयत्न, प्रेयसीनेही घेतले विष
By Admin | Updated: June 7, 2016 20:38 IST2016-06-07T20:38:09+5:302016-06-07T20:38:09+5:30
प्रेमप्रकरण सुरू असताना प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करणाऱ्या प्रियकराचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने तरुणीने भर मांडवात नवरदेवाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला

लग्नाच्या मांडवात नवरदेवाला पेटविण्याचा प्रयत्न, प्रेयसीनेही घेतले विष
गजानन नानोटकर
पुसला (अमरावती) : प्रेमप्रकरण सुरू असताना प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करणाऱ्या प्रियकराचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने तरुणीने भर मांडवात नवरदेवाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वऱ्हाड्यांच्या जागरूकतेमुळे पुढील अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना वरुड तालुक्यातील पुसला येथे एका विवाह सोहळ्यात ६ जून रोजी घडली. मांडवात पेट्रोलसह शिरलेली तरुणीदेखील विष प्राशन करून आल्याचे लक्षात येताच वऱ्हाड्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
मध्य प्रदेशातील एका तरूणाचा पुसला येथील तरूणीशी विवाह ठरला होता. तोे ६ जून रोजी ठरल्याप्रमाणे वरातीसह वधूमंडपी आला. परंतु त्याच्या प्रेयसीला त्याच्या विवाहाची कुणकुण लागली आणि तिने सोमवारी सकाळी १० वाजताच पुसला गाठले. ती येथील बसस्थानकावरच थांबली. दुपारी साडेबारा वाजता नवरदेवाचे वधूमंडपी आगमन होताच मोक्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणीने थेट वधूमंडपात प्रवेश केला आणि नवरदेव बोहल्यावर चढताच हातात आणलेल्या पेट्रोलच्या दोन बाटल्यांमधील पेट्रोल नवरदेवाच्या अंगावर फेकले.
ती आगपेटी उगाळणार इतक्यात वऱ्हाडी मंडळींनी तिला बाजूला ओढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
घटनेच्या वेळी ती तरुणीदेखील विषप्राशन करुनच आल्याचे वऱ्हाड्यांच्या लक्षात आल्याने तिला तातडीने पांढुर्णा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर वधुपक्षाची पाचावर धारण बसली होती. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांनी विवाह टिकविण्याची हमी स्टँपपेपर दिल्यानंतर सकाळच्या मुहूर्तातील हा सोहळा रात्री १० वाजता कसाबसा उरकला. दरम्यान वऱ्हाडयांनीसुध्दा काढता पाय घेतला होता. वधू-वर पक्षाच्या सहमतीने हा विवाह पार पडला. पोलिसांनीदेखील याप्रकरणी कोणतीही कारवाई कागदोपत्री न करता दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणल्याने गावकरी पोेलिसांच्या भूमिकेचे कौतुक करीत होते.