पोलीस ठाण्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: April 7, 2015 04:41 IST2015-04-07T04:41:49+5:302015-04-07T04:41:49+5:30
दंगलीचा गुन्हा दाखल केलेल्या एका आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री वडाळा येथे घडली

पोलीस ठाण्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : दंगलीचा गुन्हा दाखल केलेल्या एका आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री वडाळा येथे घडली. याबाबत वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात या आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री वडाळा परिसरातील कोकरी आगार येथे काही रहिवासी तलवारी आणि काठ्या घेऊन गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत गोंधळ शांत करीत सात ते आठ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये निसार खान या तरुणाचा देखील समावेश होता. पोलिसांनी सर्व आरोपींवर दंगलीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना मेडिकलसाठी घेऊन जात होते.
या वेळी या तरुणाने लॉकअपमध्ये स्वत:चा शर्ट काढून शर्टाने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ या तरुणाला खाली उतरवले. मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हादेखील दाखल केला आहे. (प्रतिनिधी)