महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: November 29, 2015 02:36 IST2015-11-29T02:36:55+5:302015-11-29T02:36:55+5:30
महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न तिच्या मुलाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेहकुरी येथे फसला. पोलिसांनी तिघांना गजाआड केले असून एक आरोपी पळून गेला.
_ns.jpg)
महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
कर्जत (अहमदनगर) : महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न तिच्या मुलाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेहकुरी येथे फसला. पोलिसांनी तिघांना गजाआड केले असून एक आरोपी पळून गेला.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे बाळू दौलत मांडगे यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरातील सर्व सदस्य उंच आहेत. पैशांचा पाऊस पाडण्यासाठीआलेल्या आरोपींना उंच महिला हवी होती. शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी बाळू मांडगे, त्यांची पत्नी घरीच होती. तेव्हा सहा वाजेच्या सुमारास अंकुश काळे व देविदास कर्पे हे आणखी दोन व्यक्तींसमवेत त्यांच्या घरी आले. ते म्हणाले, तुमची पत्नी उंच आहे. त्यांची उंची मोजल्यावर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, असे सांगत आरोपी मांडगे यांच्या पत्नीची उंची मोजण्यास पुढे आले असता, मांडगे पती-पत्नीने त्यांना विरोध केला व घराबाहेर काढले. मात्र त्यातील दोघांनी लाथ मारून घालून दरवाजा उघडला, यानंतर आणखी दोन आरोपी आले. त्यांनी उंची मोजण्यास सुरुवात केली. तेवढ्यात या महिलेचा मुलगा अमोल मांडगे हा घरी आला. काय चाललेय, हे त्याला काही वेळ समजलेच नाही. त्याने शिताफीने दरवाजा लावला. मात्र यावेळी चार आरोपींपैकी एक देविदास कर्पे पळून जाण्यात यशस्वी झाला. अमोल मांडगे यांनी तीन आरोपींना घरात कोंडले व पोलिसांना कळविले. पोलीस आले, तीन आरोपींना पकडून घेऊन गेले. या आरोपींमध्ये गावातील एकाचा समावेश आहे.
अंकुश काळे, देविदास कर्पे, सुरेश कुळधरणे, सुभाष बाबासाहेब धुमाळ यांच्याविरोधात कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.