पत्रकारांवर हल्ला करणारे अटकेत
By Admin | Updated: March 2, 2017 02:59 IST2017-03-02T02:59:18+5:302017-03-02T02:59:18+5:30
अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला

पत्रकारांवर हल्ला करणारे अटकेत
नवी मुंबई : अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला होता. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अद्यापही २५ ते ३० जण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु घटनेवेळी उपस्थित पोलिसांकडे मदत मागूनही ती वेळेवर न मिळाल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप जखमी महिला पत्रकाराने केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर दिघा येथील चार अनधिकृत इमारतींवर मंगळवारी जप्तीची कारवाई सुरू होती. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणच्या रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे केवळ दोनच इमारतींना सील ठोकण्यात आले असून उर्वरित दोन इमारतींवर पुढील दोन दिवसांत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, दुर्गामाता व अवधूत धाया या दोन इमारतींवर जप्तीची कारवाई सुरू असताना, वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार स्वाती नाईक ह्या लगतच्या इमारतीच्या छतावरून कॅमेरामन संदीप भारती यांच्यासह चित्रीकरण करत होत्या. त्यांना पाहताच उपस्थित जमावापैकी एका गटाने त्यांच्यावर दगडफेक करण्याला सुरवात केली. यामुळे स्वाती नाईक व संदीप भारती यांनी इमारतीबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, काही जण इमारतीमध्ये घुसून त्यांचा शोध घेवू लागले. पर्यायी दोघा पत्रकारांनी त्याच इमारतीमधील एका घरात लपून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी २५ ते ३० जणांचा जमाव येत असल्याची माहिती कारवाईच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दिली. परंतु त्यांनी मदतीऐवजी ‘तुम्ही त्याठिकाणी गेलाच कशाला’ असा उलट प्रश्न करत प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. अखेर त्या जमावाने पत्रकार लपलेल्या घराचा शोध घेवून तिथल्या सामानाची तोडफोड करत दोघांनाही गंभीर मारहाण केली. यामध्ये संदीप भारती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर स्वाती नाईक यांनाही दुखापत झाली आहे.
या हल्ल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांना अटक केली आहे. अल्लाउद्दीन अन्सारी, मनीष भागणे व नारायण पवार अशी त्यांची नावे आहेत. ते अमृतधाम इमारतीमधील रहिवासी असून या इमारतीवर देखील जप्तीची कारवाई होणार आहे. त्यांना हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्यामागे राजकीय हात असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आली आहे. शिवाय जमावाकडून पत्रकारांवर झालेला हल्ला यशस्वी होण्याला पोलीस कारणीभूत असल्याचाही आरोप होत आहे. तर घटनेनंतरही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अथवा उपआयुक्त यांच्यापैकी कोणीच साधी चौकशी देखील केली नसल्याचीही खंत स्वाती नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावरून दोघा पत्रकारांवर जीवघेणा हल्ला होवूनही पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)