न्यायालयाच्या आवारात पीडित महिलेच्या कुटुंबीयांवर हल्ला
By Admin | Updated: March 10, 2015 02:07 IST2015-03-10T02:07:45+5:302015-03-10T02:07:45+5:30
अकोला येथील घटना; आरोपींनी तलवारीने केला हल्ला.

न्यायालयाच्या आवारात पीडित महिलेच्या कुटुंबीयांवर हल्ला
अकोला: जुन्या वादातून आरोपी पती व त्याच्या आठ ते दहा सहकार्यांनी पीडित महिलेच्या काका व भावावर न्यायालयाच्या आवारातच प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी दगडफेक करून व तलवारीने हल्ला करून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे विधिज्ज्ञ व पक्षकारांची चांगली धावपळ उडाली. उशिरा रात्रीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉटमधील निलोफर सुलताना हिचा पतीसोबत वाद सुरू असून, त्यांच्या वादाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी सोमवारी दुपारी निलोफरचा पती मोहम्मद आजम अब्दुल रहमान याचा भादंवि कलम ४९८ मध्ये वारंट निघालेला होता. त्यासंबंधी न्यायालयात सुनावणी होणार असल्याने निलोफर तिच्या माहेरच्या कुटुंबासह न्यायालयात हजर होती. यावेळी अचानक तिचा आरोपी पती मोहम्मद आजम अब्दुल रहमान व त्याचे नातेवाईक मोहम्मद नईम अब्दुल रहमान, अब्दुल खालीद मोतावा, अब्दुल फारूख अब्दुल खालीद, अब्दुल रहीम यांच्यासह अज्ञात तीन ते चार युवकांनी तलवार, लोखंडी पाईपने निलोफरच्या कुटुंबीयावर हल्ला चढविला. एवढेच नाहीतर आरोपींनी दगडफेक केली आणि आरोपी त्यांच्या चार मोटारसायकली सोडून पळून गेले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे न्यायालय आवारात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यामध्ये निलोफर सुलताना हिच्यासह तिचे काका मोहम्मद फारूख अब्दुल वहाब, भाऊ मोहम्मद जावेद मोहम्मद इकबाल हे तिघे जखमी झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपीच्या चार मोटारसायकली व त्यांनी टाकून दिलेली तलवार व पाईप जप्त केला.