मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, अजिंठा लेणी टी पॉइंटवरील घटना
By Admin | Updated: June 26, 2017 22:44 IST2017-06-26T22:44:13+5:302017-06-26T22:44:13+5:30
सलग सुट्या आल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शनिवार, रविवारप्रमाणेच सोमवारीही पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली, परंतु दर सोमवारी

मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, अजिंठा लेणी टी पॉइंटवरील घटना
शिवाजी महाकाळ/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २६ - सलग सुट्या आल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शनिवार, रविवारप्रमाणेच सोमवारीही पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली, परंतु दर सोमवारी अजिंठा लेणी बंद राहात असल्याने येथे आलेल्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. त्यातच टी पॉइंटवर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास चवताळलेल्या मधमाशांनी जवळपास शंभरावर पर्यटकांवर हल्ला चढविल्याने त्यांना पळता भुई थोडी झाली.
शनिवारपासूनच अजिंठालेणीत पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दोन दिवसात जवळपास दहा हजार पर्यटकांनी अजिंठालेणीस भेट दिली, तर सोमवारी रमजान ईदची सुट्टी असल्याने सकाळी दहा वाजेपासूनच जगप्रसिद्ध अजिंठालेणीत येणाऱ्या पर्यटकांची फर्दापूर अजिंठालेणी टी पॉइंटवर प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच येथील दुचाकीकरीता उभारलेले वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.शनिवार रविवार व सोमवार या तीन दिवसात अंदाजे पंधरा हजार पर्यटकांनी भेट दिली.
लेणी बंद असल्याने हिरमोड
सोमवारी लेणी बंद असल्याने हिरमोड झालेल्या पर्यटकांनी टी पॉइंट येथील बाल उद्यान व व्यापारसंकुलनातच सुट्टीचा आनंद लुटण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यात कुणीतरी येथील आग्या मोहोळाच्या पोळ्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास दगड मारला. यामुळे चवताळलेल्या मधमाशांनी बालउद्यान, व्यापार संकुल, वाहनतळ परिसरातील पर्यटक, लहान मुले, स्थानिक व्यावसायिकांवर हल्ला चढविल्याने एकच धावपळ उडाली. सर्वजण सैरावैररा धावत सुटले, पण मधमाशांनी त्यांचा पिछा सोडला नसल्याने पर्यटकांना पळता भुई थोडी झाली. १५ मिनिटातच परिसर निम्याहून अधिक रिकामा झाला. काही व्यापाऱ्यांनी कडूलिंबाचा पाला जाळून धूर निर्माण करुन मधमाशांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चवताळलेल्या मधमाशांनी शेकडो पर्यटकांना चांगलेच फोडून काढले होते.