नाशकात बीट मार्शलच्या पोलिसावर हल्ला
By Admin | Updated: September 9, 2016 00:44 IST2016-09-08T22:34:35+5:302016-09-09T00:44:24+5:30
नाशिकमधल्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील विजय मोरे या पोलीस हवालदारावरही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला

नाशकात बीट मार्शलच्या पोलिसावर हल्ला
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी लोकांना इशारा देऊनही हे हल्ले काही थांबत नाही आहेत. नाशिकमधल्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील विजय मोरे या पोलीस हवालदारावरही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकमधल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पिंपळ चौक परिसरात बीट मार्शलवरून गस्त घालत असताना दोन टोळक्यांमध्ये भांडण झालं.
ते सोडवण्यासाठी मोरेंनी मध्यस्थी केली असता जमावमधून एकाने लाकडी दंडुका घेत पाठीमागून त्यांच्या डोक्यावर मारला . रात्री साडे 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली . नाशिकच्या खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फडणवीस गेल्यानंतर चार तासांत हल्ला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी पोलिसांवर हल्ला हा यंत्रणेवर हल्ला असल्याचे सांगत हल्लेखोरांचा खटला जलद न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. फडणवीस यांनी शहर सोडताच अवघ्या तीन तासांमध्ये बिट मार्शलवर टोळक्यातील सराईत पाकिटमारांनी हल्ला केला. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला व धक्काबुक्की झाल्याची ही चार दिवसांत दुसरी घटना आहे.
पोलीस हा जनतेच्या सुरक्षेसाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत कर्तव्य बजावत असतो. पोलिसांवरील हल्ले खपवून न घेता हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी.
- आशा मोरे, जखमी मोरे यांची पत्नी