मागास विद्यार्थी वसतिगृहात विषबाधा झाल्यास ‘अॅट्रॉसिटी’
By Admin | Updated: March 23, 2017 23:44 IST2017-03-23T23:44:55+5:302017-03-23T23:44:55+5:30
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा, भेसळीचे प्रकार घडल्यास अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याचा विचार करण्यात येईल

मागास विद्यार्थी वसतिगृहात विषबाधा झाल्यास ‘अॅट्रॉसिटी’
मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा, भेसळीचे प्रकार घडल्यास अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याचा विचार करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील मूळ ठेकेदार जर आपल्या कामाचे कंत्राट उपकंत्राटदाराला चालविण्यास देत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे कांबळे म्हणाले.
चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणात पाल सापडल्याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई का होत नाही, असा प्रश्न भाजपाचे सरदार तारासिंग यांनी केला. या वेळी डॉ. बालाजी किणीकर, भारती लव्हेकर, आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती केली. चेंबूरच्या प्रकरणात यश बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचा भोजन ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला आहे. त्याच्या जागी शुभांगी मल्टी ट्रेडिंग अॅण्ड कॅटरर्स यांना तात्पुरता ठेका देण्यात आल्याची माहिती दिली. मूळ ठेकेदार आपले काम दुसऱ्या ठेकेदाराकडे देत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)