कारागृहात होतात वरिष्ठांकडूनच अत्याचार
By Admin | Updated: July 13, 2017 05:12 IST2017-07-13T05:12:48+5:302017-07-13T05:12:48+5:30
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणानंतर राज्यातल्या कारागृहांतील गैरप्रकारांना वाचा फुटू लागली आहे

कारागृहात होतात वरिष्ठांकडूनच अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणानंतर राज्यातल्या कारागृहांतील गैरप्रकारांना वाचा फुटू लागली आहे. कारागृहात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केले जात आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र एका जिल्ह्यातील कारागृह अधीक्षक पदावर कार्यरत महिला अधिकाऱ्याने लिहिले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांना या अधिकाऱ्याकडून तसे पत्र आले आहे.
वरिष्ठांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असलेले एक पत्र मिळाले. सहीनिशी आलेल्या या पत्राची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिला अधिकाऱ्याने आपण तसे पत्र पाठविले नसल्याचे म्हटले आहे. या पत्रात कारागृह विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांविषयी संशयास्पद व धक्कादायक बाबी नमूद केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या पत्रातील आरोपांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले असून, चौकशीची मागणी केल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
गोऱ्हे आणि चित्रा वाघ यांना आलेल्या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्याबाबत तक्रारी आहेत. कामात चुका दाखवून रिपोर्ट करण्याबाबतच्या धमक्या देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्याची मध्यवर्ती कारागृहात बदली झाली; तेव्हा या अधिकाऱ्याने राजकीय वजन वापरून या महिलेचीही बदली मध्यवर्ती कारागृहात करवून घेतल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
माझ्या बायकोला कॅन्सर आहे. ती जास्त दिवस जगणार नाही, त्यानंतर आपण लग्न करू, असे अधिकाऱ्याने महिलेला सांगितले. आजपर्यंत कारागृह खात्यातील ६० ते ७० महिलांवर बलात्कार केला असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत संबंधावरून अन्य अधिकारीदेखील तशी मागणी करत. अजूनही बळजबरीने संबंध ठेवण्याचे प्रकार सुरू असून, त्याचा तपास व्हावा, अशी मागणी पत्रात केली आहे. सहीनिशी असलेले पत्र आपण लिहिलेच नसल्याची भूमिका सदर महिला अधिकाऱ्याने घेतली असली तरी पत्रातील आरोपांचे गंभीर स्वरूप पाहता संपूर्ण प्रकरणाचा तपास होणे गरजेचे असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.