अपहरण करून अल्पवयीन मुलीवर औरंगाबादमध्ये अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:17 IST2018-03-30T06:18:40+5:302018-03-30T15:17:43+5:30
नौपाड्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून औरंगाबाद येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भावेश धोत्रे (१९, रा. नागोबाची वाडी

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर औरंगाबादमध्ये अत्याचार
ठाणे : नौपाड्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून औरंगाबाद येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भावेश धोत्रे (१९, रा. नागोबाची वाडी, हरिनिवास सर्कल, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
२२ मार्चला दहावीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून मुलगी घराबाहेर पडली आणि बेपत्ता झाली होती. २३ मार्च रोजी कुटुंबियांनी पोलिसांता अपहरणाची तक्रार नोंदविली. दरम्यान, भावेशने २४ मार्च रोजी औरंगाबाद येथील महादेवाच्या मंदिर परिसरातून त्याच्या आईला फोन केला आणि लग्न केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी औरंगाबाद रेल्वे स्थानकात सापळा रचून बुधवारी त्याला अटक करून अपहृत मुलीची सुखरुप सुटका केली.
अवघ्या १२०० रुपयांमध्ये लग्न
लग्नासाठी मुलीचे मन वळविल्यानंतर तिने घरातून ५००, तर भावेशने ७०० रुपये घेतले. त्यांनी औरंगाबाद गाठले. तिथे एकमेकांना हार घालून लग्न केल्याची कबुली त्याने दिली. मंदिर परिसरातच ते राहिले. भावेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले.