एटीएम सेवाही महागणार?
By Admin | Updated: October 26, 2014 22:37 IST2014-10-26T21:06:13+5:302014-10-26T22:37:29+5:30
ग्राहकांना धक्का : यापुढे महिन्याला केवळ तीनच व्यवहार

एटीएम सेवाही महागणार?
रत्नागिरी : एटीएम सुविधा ग्राहकांसाठी बँकांनी जारी केली. ग्राहकांना त्यामुळे केव्हाही व कधीही पैसे काढता येत होते. परंतु बँकांनी त्यावर निर्बध आणले होते. मासिक पाचव्या व्यवहारानंतर पुढील व्यवहारासाठी पैसे आकारले जात असत. परंतु, आता तर पहिले तीन व्यवहारच मोफत होणार असून पुढील व्यवहारासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने आॅगस्ट २०१४ मध्ये हे एटीएम व्यवहारावर निर्बंध आणणारे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार दि. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. पहिले तीन व्यवहार मोफत असा आदेश असला तरी व्यवहार म्हणजे फक्त पैसे काढणेच नव्हे. एटीएममध्ये जावून तुम्ही मिनी स्टेटमेंट वा बॅलन्स इन्क्वायरी केलीत तरी तो ‘व्यवहारच’ समजला जाईल. त्यामुळे तीनवेळा एटीएममध्ये गेल्यानंतर पुढील प्रत्येक व्यवहारासाठी २० रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. काही बँकानी त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याचे ठरविणार आले आहे. त्यानुसार ग्राहकांना एसएमएस पाठविण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी बँक ग्राहकांना अमर्यादित व्यवहार करता येत होते. मात्र हळूहळू या व्यवहारावर निर्बंध आणण्यात येत आहे. परिणामी आता एटीएमच्या प्रेमात पडलेल्या ग्राहकांसाठी हे प्रेम भुर्दंड पाडणारे ठरणार आहे. (प्रतिनिधी)