आठवले यांचे तळ्यात-मळ्यात

By Admin | Updated: September 27, 2014 05:44 IST2014-09-27T05:44:56+5:302014-09-27T05:44:56+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे भाजपाबरोबर जाणार की शिवसेनेबरोबर याबाबतची अनिश्चितता कायम आहे

In Athwale's pond | आठवले यांचे तळ्यात-मळ्यात

आठवले यांचे तळ्यात-मळ्यात

मुंबई : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे भाजपाबरोबर जाणार की शिवसेनेबरोबर याबाबतची अनिश्चितता कायम आहे. शिवसेनेने आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाचे तर भाजपाने केंद्रात कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाचे गाजर दाखवले आहे.
भाजपा-शिवसेनेची युती तुटल्यानंतर आठवले कुणाबरोबर जाणार, याबाबत संभ्रम कायम आहे. गुरुवारी रात्री आठवले यांना ‘मातोश्री’वरून बोलावणे आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे तुम्ही शिवसेनेची साथ सोडून जाऊ नका, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रिपद देऊ. त्याचबरोबर किमान चार जणांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले.
त्यानंतर आठवले यांना भाजपाच्या नेत्यांनी भेटीला बोलावले. भेटीत आठवले यांना केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्याचा विषय निघाला. त्यामुळे भाजपा नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दूरध्वनी केला. आठवले व शहा यांचे बोलणे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, ते परतल्यावर मंत्रिपदाचा विषय मार्गी लावण्याचा शब्द शहा यांनी दिला. याखेरीज विधान परिषदेच्या चार जागा, महामंडळांची अध्यक्ष व सदस्यपदे देण्याचा शब्द भाजपाने दिला. आठवले हे सध्या या प्रस्तावावर विचार करीत आहेत. अमित शहा शनिवारी मुंबईत असून, उद्धव ठाकरे यांची प्रचाराच्या शुभारंभाची सभा महालक्ष्मी रेसकोर्सवर आहे. आठवले हे नेमकी कुठे हजेरी लावतात त्यावर कदाचित त्यांची भूमिका स्पष्ट होईल.

Web Title: In Athwale's pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.