अश्विनी एकबोटे यांचे निधन, रंगभूमीवरच आयुष्याची ‘भैरवी’
By Admin | Updated: October 22, 2016 22:32 IST2016-10-22T21:47:49+5:302016-10-22T22:32:02+5:30
अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले आहे. भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला.

अश्विनी एकबोटे यांचे निधन, रंगभूमीवरच आयुष्याची ‘भैरवी’
>
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी एकबोटे (वय ४४) यांचे शनिवारी रात्री आठच्या सुमारास नाट्य- त्रिविधा या कार्यक्रमाचा प्रयोग सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
नाट्य- त्रिविधा या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी पाच वाजता भरतप नाट्यमंदिर येथे होता. अश्विनी यांची चार नृत्ये झाली होती. शेवटच्या भैरवीसाठी त्या आल्या असता स्टेजवरचा कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मागे पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांत त्यांनी अनेकविध भूमिका साकारल्या. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘एका क्षणात’ या नाटकामध्ये त्या काम करत होत्या. डेबू, महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, डंक्यावर डंका, क्षण हा मोहाचा, हाय कमांड या चित्रपटांत तसेच दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, कशाला उद्याची बात या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.